इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आयआयटी संस्था ही भारतातील अत्याधुनिक आणि अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. आयआयटीच्या देशभरात अनेक शाखा असून यामध्ये अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या नोकरीची संधी प्राप्त होते, इतकेच नव्हे तर भारताबाहेर देखील त्यांना उच्च पदावर नोकरी मिळते.
गुगल कंपनीने आयआयटी ISM धनबादच्या एका विद्यार्थ्याला ५६ लाख रुपयांचे वार्षिक वेतन पॅकेज ऑफर केले आहे. अभिनव झा या ड्युअल डिग्री कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ही ऑफर ऑफ कॅम्पस मिळाली. या वार्षिक सत्रातील हे दुसरे सर्वोच्च वेतन पॅकेज आहे. यापुर्वी अभिनवला गोल्डमन सेसकडून नोकरीची ऑफरही आली आहे.
यापूर्वी आयआयटी धनबादच्या गणित आणि संगणनाच्या विद्यार्थ्याला ऑफ-कॅम्पसमध्ये एक कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले होते. आयआयटी आयएसएमच्या विद्यार्थ्यांना चांगले पॅकेज मिळाल्याने संस्थेत आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी, कॅम्पसमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वार्षिक ५० लाख रुपये मिळत होते.
अनेक कंपन्यांनी IIT-ISM मधील २०२२ बॅचच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस निवड केली आहे. यात बार्कलेने एमबीएचा विद्यार्थी निवडला आहे. तर डार्विन बॉक्सने दोन विद्यार्थ्यांना आणि कॉग्निझंट एसआयपीने दोन विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत. त्याचवेळी एका कंपनीने आठ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देऊ केली आहे. कंपन्यांच्या कॅम्पस निवडीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत तज्ज्ञांनी सांगितले आहे की, २०२२ बॅचच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आतापर्यंत ८५५ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. यापैकी १६ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. १२८ विद्यार्थ्यांना ३० लाखांहून अधिकचे पॅकेज मिळाले आहे. ४८९ विद्यार्थ्यांना १० ते ३० लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.