नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर काय करेल हे सांगता येत नाही. शहरातील वडाळागावात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एक प्रियकर बुरखा घालून चक्क प्रेयसीला भेटायला आला होता. ही बाब उघड होताच स्थानिक नागरिकांनी या प्रियकराला बेदम चोप दिला आहे.
आपल्याला कोणीही पाहू नये, किंवा ओळखू नये तसेच प्रेयसीच्या कुटुंबियांना कुठलाही संशय येऊ नये म्हणून एका प्रियकराने चक्क बुरखा घालण्याची शक्कल लढविली. प्रियकर बुरखा घालून थेट प्रेयसीला भेटायला आला. मात्र ही शक्कल प्रियकराच्या अंगलट आली आहे.
प्रियकराच्या संशयास्पद हालचालींमुळेच त्याचे बिंग फुटले आहे. काहींना संशय आला की बुरखा घालून आलेली व्यक्ती लहान मुलांना पळविणार आहे. त्यामुळे क्षणार्धात मोठा जमाव जमला आणि त्यांनी या प्रियकराला बेदम चोप दिला आहे. संतप्त जमावाने लाथ्या बुक्क्यांनी मारहाण करत असतानाच घटनास्थळावरून पोलिसांचे वाहन जात होते. तत्क्षणी पोलिसांनी हा प्रकार थांबवून चौकशी केली. त्यात बुरखा घालून आलेली व्यक्ती प्रियकर असून तो प्रेयसीला भेटायला आल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी मध्यस्थी करीत मारहाण करणाऱ्या नागरिकांना दूर केले. त्यामुळे या युवकाची जमावातून सुटका झाली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बुरखा परिधान केलेली महिला मुलांचे अपहरण करत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. आणि आता तीच व्यक्त आल्याचे समजून नागरिकांनी या युवकाला जोरदार मारहाण केली.
Burkha Youth Beaten by Mob Crime
Nashik