इंडिया दर्पण विशेष लेखमाला
बुलेटवर भारत भ्रमंतीचा थरार – भाग ४
जम्मूतला प्रवेश आणि सारंच विलक्षण
अमृतसर ते जम्मू हा प्रवास विलक्षणच म्हणावा लागेल. तिथे आम्ही काय नाही अनुभवलं. आदर सत्कारापासून ते सरप्राईजपर्यंत सारेच अचंबित करणारे होते. तुम्हालाही हा अनुभव नक्कीच अतिशय सुखद वाटेल. चला, तर वेळ घालवण्यापेक्षा त्या प्रवासाकडे जाऊया…

इंदिरानगर, नाशिक
इ मेल – Dipikamore.19@gmail.com
अमृतसरहून आता आमचा पुढचा प्रवास जम्मूसाठी सुरू होणार होता. एकीकडे खूप उत्साह आणि दुसरीकडे भयंकर टेन्शन, असं काही सगळं सुरू होतं. जम्मू आणि कश्मीर हा जरा सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये घालमेल सुरू होती. गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडून आमच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घेतली गेली होती. पोलिसांच्या दोन एस्कॉर्टस आणि जम्मू येथे पोहोचेपर्यंत रस्त्यालगत ठिकठिकाणी उभे असलेले सोल्जर्स आमच्या आत्मविश्वास वाढवत होते. तरीही जम्मू आणि काश्मीर सीमेलगत प्रवेश करताना अंगावर शहारे येत होते. जवळपास 25 किलोमीटर जम्मूच्या अलीकडे रस्ता आमच्यासाठी ब्लॉक करून ठेवला होता. आणि ठिकठिकाणी इंडियन आर्मीचे जवान पहारा देत होते. त्यावेळी पठाणकोट येथील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. आमच्या सुरक्षेसाठी जो काही फौजफाटा होता तो जणू एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी उभा आहे, असेच वाटत होतं. या दृश्यानं आमचं मन भरून आलं होतं. कारण आम्ही देशासाठी राईड करत होतो.
तसं बघायला गेलं तर जम्मू आणि काश्मीर मध्ये स्वातंत्र्याचा सोहळा असा खुल्या पद्धतीने साजरा करण्याची आणि तेही बाहेरून येऊन बायकर्सने साजरा करण्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ असणार. पोहोचण्याच्या आधी आम्हाला वाटेत भयंकर पाऊस लागला. आणि आमचे रेन गिअर्स आमच्या सोबत नव्हते. त्यामुळे आम्ही सगळेच पूर्ण ओले झालो होतो. आणि मग जम्मू येथे पोहोचल्यानंतर हरी निवास पॅलेस येथे तिथल्या खासदारांनी आणि तोच ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सदस्यांनी मोठ्या जल्लोषात आमच्या रॅलीच स्वागत केलं. प्रत्येकाचं फॅलिसिटेशन करून झाल्यानंतर आम्हाला जेवण पुरवण्यात आलं. जेवण आटोपल्यानंतर आता आम्हाला पुढे जायचे होते आणि आजचा आमचा मुक्काम हा आयुष्यात पहिल्यांदा आर्मीच्या जवानांसोबत आर्मी कॅम्प मध्ये होणार होता. एवढी प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
हरी पॅलेसमधून निघाल्यानंतर पुन्हा आर्मी कॅम्प पर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यात भला मोठा सैनिकांचा ताफा आम्हाला जागोजागी सुरक्षा देत होता. कुठेही काही अघटित घटना घडू नये, यासाठी सबंध रस्ता इतर वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. मग आम्ही जम्मू येथे आर्मी कॅम्प मध्ये पोहोचतात. त्या जवानांनी देशभक्तीपर गीते वाजवित आमचे जल्लोषात स्वागत केले. बऱ्याच वेळ तिथल्या ऑथॉरिटीशी गप्पा मारल्यानंतर आम्हाला आमची निवासाची जागा दाखवण्यात आली.
आर्मीच्या कॅन्टमध्ये स्त्रियांना आणि पुरुषांना वेगवेगळे राहण्याची सोय करण्यात आली होती. एखाद्या सिनेमात दाखवता त्या पद्धतीने एक मोठी कॉमन खोली आणि त्यात वर खाली असलेले ते बेड. हे एवढे एक्साइटिंग होतं. खूप मजा येत होती. आयुष्यात हा अनुभव कधी घेतला असता माहित नाही. आता संध्याकाळचे सात-साडेसात वाजले होते आम्ही फ्रेश होऊन जेवणाची वाट बघत होतो. तेवढ्यात तिथले एक कर्नल आमच्या जवळ आले आणि आम्हाला आर्मी कॅन्टीनच्या मिलिटरी स्टोअरमधून काही हवे असल्यास सोबत येतो असे म्हणाले
आणि मग काय म्हणतात आम्ही बायका त्या आर्मी स्टोअर मध्ये जाऊन खरेदी करत सुटलो. थंडीचे कपडे, ग्लोज, शूज एवढी खरेदी केली की बॅगेत जागा उरलीच नाही.
आमच्या सोबत असलेले पुरुष सदस्यही शॉपिंग साठी आले आणि त्यांनीही थंडीच्या कपड्यांची प्रचंड शॉपिंग केली. अर्थातच मिलिटरीसाठी येणाऱ्या वस्तूंची कॉलिटी ही एक नंबर असल्यामुळे तशी शॉपिंग दुसरीकडे होणार नव्हती. आता रात्रीचे साडेआठ वाजले होते. आम्हाला जेवणासाठी बोलवण्यात आले. जेवायला गेलो तर बघतो काय डायनिंग हॉलमध्ये आमच्या सोबत इतर सैनिकही जेवायला बसले होते. आणि ते अतिशय कौतुकाने आमच्याकडे बघत होते. त्यातल्या त्यात आम्ही महिला प्रतिनिधी राईड करतोय तेही अठरा हजार किलोमीटर हे ऐकल्यानंतर त्यांनी आम्हाला मानवंदना दिली.
तिथे असलेले काही मराठी सैनिक मला भेटायला आले. ते कुठले, मी कुठली, ते कधी नाशिकला येऊन गेले का वगैरे वगैरे… अशा आमच्या खूप गप्पा झाल्या. त्यातले बरीच सैनिक हे आपल्या नाशिकच्या देवळाली येथील ट्रेनिंग सेंटर मधून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडले होते. बरेच अनुभव त्यांनी तिथे सांगितले. नंतर आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. आता मात्र ती एक विशाल खोली आणि आम्ही दहा महिला एवढा उत्साह रात्रभर धमाल करत होतो. गप्पा, गोष्टी, गाणी, नाच याचा मनमुराद आनंद घेतला. एखाद्या सिनेमात असावं तसं ते दृश्य होतं. आणि मग उशिरा रात्रीपर्यंत धमाल झाल्यानंतर आम्ही सर्व झोपलो. आता दुसऱ्या दिवशी स्वप्नातलं गाव म्हणजेच कश्मीर गाठायचे होते.
(क्रमशः)
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – Dipikamore.19@gmail.com
Bullet Ride India Jammu Journey by Deepika Dusane
Column Special Article Women Ride