मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोरेपणा म्हणजेच सौंदर्य अशी व्याख्या असणाऱ्या बॉलीवूडच्या जगात ती आली, आणि आपल्या अभिनयाने सर्वांना जिंकलं देखील. रूढार्थाने ती रूपवान नाही. सावळी असली तरी नाकी डोळी नीटस आणि चेहरा विलक्षण बोलका. याच जोरावर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. अशाच या गुणी अभिनेत्री काजोल विषयी आज आपण जाणून घेणार आहोत..
अभिनेत्री तनुजा हिची मुलगी अशी ओळख असलेली काजोल अल्पावधीतच या क्षेत्रात स्थिरावली. अभिनयाचं बाळकडू तर घरातूनच मिळालं होतं. त्यात आपल्या गुणवत्तेने अधिक भर घालत तिने आपले पाय इथे घट्ट रोवले. इतके की काजोल असली की चित्रपट हिट हे समीकरणच झालं. १९९२ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी तिने ‘बेखुदी’ चित्रपटातून तिने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट जरी पडला तरी त्यातील काजोलच्या अभिनयाची मात्र चांगलीच चर्चा झाली. त्याच जोरावर तिला शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टीसोबत ‘बाजीगर’ हा चित्रपट मिळाला. तो हिट झाला.
लहान वयातच अभिनय करायला सुरुवात केल्याने तिचे शिक्षण मात्र अर्धवट राहिले. तिच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ला तर अभूतपूर्व यश मिळालं. करण-अर्जुन, गुप्त, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है, फना असे अनेक यशस्वी चित्रपट तिने आजवर दिले आहेत. ‘गुप्त’मधील तिची खलनायकी भूमिका देखील प्रेक्षकांना चांगलीच भावली.
तिच्या अनेक चित्रपटांसाठी तिला ‘फिल्मफेअर’ पुरस्कार देण्यात आला आहे. तर गुप्त चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर २०११ मध्ये तिला ‘पद्मश्री’ने सन्मानित केले गेले. काजोलने १९९९ मध्ये अजय देवगणसोबत लग्न केले. त्यांची जोडी ही बॉलिवूडमधील हिट जोडी मानली जाते. या दोघांना न्यासा आणि युग अशी दोन मुले आहेत.
Bollywood Actress Kajol Education Life Journey
Entertainment