इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील कलाकारांचे आयुष्य हे अत्यंत तणावग्रस्त असते. काही जण या ताणतणावाला यशस्वीरीत्या तोंड देऊ शकतात. तर काहींना ते जमत नाही. आणि यातूनच हे कलाकार नैराश्याच्या आहारी जातात. तर काही आत्महत्या करून आपल्यापुरता उपाय शोधतात. अशाच एका उमद्या नटाने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. हे प्रकरण तेव्हा चांगलेच चर्चेत आले होते.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण खूपच चर्चेत आले. या गोष्टीला आता जवळपास दोन वर्षे उलटून गेली आहेत. त्यानंतर त्याचे वांद्रे येथील भाड्याने घेतलेले घर बंदच होते. दोन वर्षे बंद असलेल्या या घराला आता नव्याने भाडेकरू मिळण्याची शक्यता आहे. हा फ्लॅट आतापर्यंत कुलूपबंद ठेवण्यात असल्याची माहिती आहे. या जागेसाठी आता नवीन भाडेकरू शोधला जातोय.
कोणतीही बॉलीवूडची पार्श्वभूमी नसताना अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने चित्रपट विश्वात स्वतःची जागा निर्माण केली. त्याचा स्वतःचा असा चाहता वर्गही निर्माण केला.
‘अमरनाथ’, ‘एम.एस.धोनी’ अशा दर्जेदार आणि उत्कृष्ट चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या. माणूस म्हणूनही तो अत्यंत उमदा होता. त्याची वागणूकही नम्र होती. यशाच्या शिखरावर असताना, चाहत्यांचे प्रेम असतानाही २०२० मध्ये त्याने वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवरील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर ही आलिशान सदनिका रिकामी होती. अभिनेत्याच्या मृत्यूचा वाद आणि राजकीय पक्षांच्या सहभागामुळे भाडेकरूंना दूर ठेवण्यात आले होते. या फ्लॅटचा मालक परदेशात राहतो. आणि आत्महत्येनंतर सुरू असलेल्या चौकशी यांमुळे फ्लॅट दोन वर्षांपासून रिकामा ठेवण्यात आला होता.
आता मिळालेल्या माहितीनुसार काही भाडेकरूंबरोबर चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. या आलिशान फ्लॅटसाठी भाडेकरूला दरमहा अंदाजे ५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. काही भाडेकरूंना जागा भाड्याने देण्यास टाळले असल्याचे फ्लॅट एजंटने उघड केले होते. अभिनेत्याच्या मृत्यूला काही काळ उलटून गेल्यामुळे आता लोक तेथे जाण्यास तयार झाले आहेत. अभिनेता सुशांतने हा फ्लॅट ३६ महिन्यांसाठी भाड्याने घेतला होता आणि डिसेंबर २०२२ पर्यंत तो तिथे राहणार होता.
Bollywood Actor Sushant Singh Rajput Flat Tenants