नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
चोरी कधी ना कधी सापडतेच, पण ती करायलाही डोकं वापरावं लागतं, असं म्हणतात. डोकं वापरून चोरी करणारे लोक मालामाल झाले, काही सापडले काही, फरार झाले, काही अजूननही समाजान मान उंच करून फिरत आहेत. संदीप गुप्ता याने मात्र चक्क तेल चोरून चारशे कोटी रुपयांची कमाई केली. अर्थात तो आणि त्याच्या टोळीतील सर्वांना आता अटक करण्यात आली आहे. पण चोरी करण्याच्या त्याच्या स्टाईलचं आता कौतुक होत आहे.
गुजरात, राजस्थान आणि इतर अनेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी ऑईलच्या पाईपलाईनचं काम सुरू असेल तिथेच पत्र्याचं शेड भाड्यानं घ्यायचं. आपल्या साथीदारांकडून पाईपलाईनला छिद्र पाडून त्यातील तेल काढायचं. बरं, दोन किंवा तीन लीटर नाही तर चक्क टँकर भर तेल चोरले जायचे. फर्निश ऑईल खरेदी करून ते विकण्याचे मोठे रॅकेट देशभर त्याने राबवले. या चोरीतून त्याने तब्बल ४०० कोटी रुपयांची कमाई केली. पण अखेर कोलकात्यातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर देशभरातील त्याचं नेटवर्कही उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बऱ्याच लोकांना अटक करण्यात आली आहे, तर बऱ्याच लोकांची माहिती हळूहळू मिळू लागली आहे.
चार राज्यांत वीस गुन्हे
पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या चार राज्यांमध्ये तेल चोरीचा सूत्रधार म्हणून संदीप गुप्तावर वीस गुन्हे दाखल आहेत. बिहारमध्येही काही ठिकाणी गुप्तावर गुन्हे आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्ये त्याने अंतरिम जामीन मिळवला होता. तेव्हापासून तो फरार होता. त्यानंतर सुरत गुन्हे शाखेने त्याला कोलकात्यातून पकडले आहे.
पत्र्याच्या शेडचं गुपित
ज्या ठिकाणी इंडियन ऑईल आणि ओनजीसीची पाईपलाईन असायची, त्याच ठिकाणी संदीप गुप्ता पत्र्याचं शेड भाड्यानं घ्यायचा. गंमत म्हणजे पाईपलाईनच्याच ठिकाणी पत्र्याचं शेड कसं उभं होतं, याचं गुपित कधीच कुणाला कळलं नाही. त्यामुळे गुप्ताचे काम आरामात व्हायचे. तेल चोरीचं काम इतकं शांतंपणे केलं जायचं, की कुणाला शंका येण्यालाही वाव नव्हता.
Crime Theft 400 Crore Earn Arrested by Police