इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘सौदागर’, ‘आँखे’, ‘सरफरोश’, ‘सत्या’, ‘वॉन्टेड’, ‘भूलभुलैया २’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता गोविंद नामदेव यांनी उत्तम काम केलं. बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या गोविंद नामदेव यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ‘शोला और शबनम’ चित्रपटामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. ही लोकप्रियता मिळवण्यापूर्वी या सुप्रसिद्ध अभिनेत्याला त्याच्या करिअरमध्ये संघर्ष करावा लागला आहे. एका मुलाखतीमध्ये गोविंद यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
गोविंद नामदेव म्हणाले, “‘शोला और शबनम’ हा माझा पहिला चित्रपट. यामध्ये मी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना आवडली. यानंतर मला बऱ्याच चित्रपटासाठी विचारण्यात आलं पण मी त्याला नकार दिला. वास्तविक याला कारण ठरला तो मला आलेला एक अनुभव, असं गोविंद सांगतात.
‘शोला और शबनम’च्या चित्रीकरणादरम्यान मी अभिनेते महावीर सिंह यांच्याबरोबर बसलो होतो. त्यांनी मला सांगितलं की, पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमधील हा माझा ३२वा चित्रपट आहे. मला इतर कोणत्या भूमिका मिळतच नाहीत. त्यांची ही गोष्ट ऐकून मीही प्रभावित झालो. या सगळ्यामध्ये मीही भरडला जाऊ नये म्हणून एक निर्णय घेतला. मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा झाली त्यास मी नकार देत गेलो.”
पुढे ते म्हणाले, “मी जेव्हा २-३ चित्रपटांसाठी नकार दिला तेव्हा माझ्याबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या. मी घमेंडी असल्याची चर्चा झाली. त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. चित्रपटामध्ये काम मागण्यासाठी मी सेटवर फिरायचो. घर चालवण्यासाठी मी वर्कशॉप घेण्यास सुरुवात केली. इतर बरीच काम केली. आज याच्याकडून तर उद्या दुसऱ्याच व्यक्तीकडून उधारीवर पैसे घेत दिवस काढले.” आज मात्र परिस्थिती बदलली असून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये गोविंद नामदेव यांचा समावेश होतो.
Bollywood Actor Govind Namdev Life journey Struggle