मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमधील परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान त्याचा लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने दुःखी आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला फारसा प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आमिर खानचा अपेक्षाभंग झाला आहे. दरम्यान, या कठीण काळात आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
लालसिंग चढ्ढा चित्रपटावर बंदी आणण्यासाठी सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली होती. आमिर खाननेही वेळोवेळी प्रेक्षकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खान खूप दुःखी आहे. हे सुरु असतानाच आमिर खान काल दुपारी चारच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचला. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. आमिर जवळपास तासभर शिवतीर्थावर होता. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी आमिर खानच्या शिवतीर्थ भेटीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.
राज ठाकरे नवीन इमारतीत रहायला गेल्यापासून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या नवीन घराला भेट दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची प्रकृतीही ठीक नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. याच कारणामुळे आमिरने राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचा चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर सध्या अडचणीतून जात आहे. त्यामुळे या भेटीबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चित्रपटसृष्टीतील विविध कलाकारांशी वेगळे, जिव्हाळ्याचे नाते आहे. जेव्हा चित्रपट निर्मात्यांना काही अडचणी येतात तेव्हा ते त्यांच्या समस्या राज ठाकरेंकडे मांडतात. विशेष म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी मनसेकडून पूर्ण प्रयत्न केले जातात. आतापर्यंत अनेक चित्रपट निर्मात्यांच्या समस्या सोडवण्यात मनसेला आतापर्यंत यश आले आहे. मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठीची धडपड किंवा पाकिस्तानी कलाकारांऐवजी भारतीय कलाकारांनी ऑफर मिळावी यासाठी मनसेने भूमिका बजावली आहे.
Bollywood Actor Aamir Khan Meet MNS Chief Raj Thackeray
Politics Entertainment