इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तामिळनाडूतील मदुराई येथे भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या इमारतीचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे. परंतु त्याची पोलखोल करण्यासाठी दोन खासदारांनी चक्क एम्सच्या जागेवर जाऊन सद्यस्थिती समोर आणली आहे. त्यामुळे सध्या त्याची देशभरात जोरदार चर्चा होत आहे.
इमारतच गायब झाली
मदुराईच्या एम्सवरुन सध्या राजकारण सुरू झाले आहे. कोठे आहे एम्सची इमारत दाखवा? असा सवाल दोन खासदारांनी केला आहे, इतकाच नव्हे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या जागेची पाहणी केली असता तेथे केवळ मातीचे ढिगारे आढळले आहेत. पूर्ण झालेली एम्सची इमारत गायब झाली की काय, असा प्रश्नच या खासदारांनी उपस्थित केला आहे.
भाजप नेते म्हणतात..
या संदर्भात भाजपच्या अन्य स्थानिक नेत्यांनी सारवासारव सुरू केली आहे. नड्डा यांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्यामुळे ते असे बोलले असावेत, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे तामिळनाडूच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले की, एम्सच्या इमारतीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. नड्डा यांच्यासोबत या बैठकीमध्ये मदुराईतील उद्योग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नड्डांचा हा दौरा २०२४ च्या निवडणुकीचा भाग समजली जात आहे.
या दोन खासदारांनी केली पोलखोल
नड्डा यांचा दौरा संपताच मदुराई प्रांतातील दोन खासदार आक्रमक झाले. सीपीएमचे सु. वेंकटेशन आणि काँग्रेसचे मणिकम टागोर यांनी मदुराईजवळील ऑस्टिनपट्टी येथील एम्सच्या नियोजित जागेलाच भेट दिली. दोघांनाही याठिकाणी केवळ मोकळी जागा दिसून आली. इमारत तर दूरच पण साधे खोदकामही सुरू झालेले नाही. त्यामुळे या खासदारांनी फलक घेऊन विचारले की, एम्स मदुराईचे ९५ टक्के काम कुठे पूर्ण झाले सांगा? येथे तर सर्व मातीचे ढिगारे, कच्चा रस्ता आणि एक संरक्ष भिंत आहे.
मंजुरीच मिळालेली नाही
एम्सच्या जागेला भेट देणारे खासदार व्यंकटेशन म्हणाले की, खरे तर प्रकल्प प्रत्यक्षात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. अद्यापही या प्रकल्पाला मंजुरीच मिळाले नाही तर इमारत कशी काय उभी राहणार? मग नड्डा हे कसे म्हणू शकतात की, प्रकल्प पूर्ण झाला आहे? आणि तो त्यांनी पंतप्रधानांनी समर्पित केला आहे. ही म्हणजे कमालच! तर काँग्रेस खासदार टागोर म्हणाले की, माजी आरोग्य मंत्री नड्डा असे खोटे बोलतात हे खूप आश्चर्यकारक आहे. ही भाजप खेळी आणि तमिळनाडूच्या नागरिकांची फसवणूक करण्याचा मार्ग आहे.
https://twitter.com/manickamtagore/status/1573192171968028672?s=20&t=EujYOkgwzd0YcD379cxZCA
BJP President Nadda AIIMS Building Claim MP Truth
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/