नाशिक : औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर छातीत आणि मानेवर चाकुने वार केले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पत्नी सुनिता आगळे (३२) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती किरण जगन्नाथ आगळे – आरणे (४२ रा.मारूती मंदिराजवळ,धर्माजी कॉलनी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगळे दांम्पत्य भाडेतत्वावर राहत असून गुरूवारी सायंकाळी या दाम्पत्यात किरकोळ कारणातून वाद झाला. यावेळी संतप्त पतीने चारित्र्याच्या संशय घेत पत्नीस अपशब्द वापरून तिच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत संशयिताने धारदार चाकू पत्नीच्या छातीत भोसकून तिच्या मानेवरही सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्याने ती बालंबाल बचावली असून परिसरातील नागरीकांनी धाव घेत गंभीर अवस्थेत तिला रूग्णालयात दाखल केले आहे. सदर महिलेच्या जबाबावरून पतीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन शेंडकर करीत आहेत.