पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याचे खासदार गिरीश बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी दिलेली स्पष्टोक्ती. ते म्हणाले की मी सध्या नाराज आहे. विशेष म्हणजे, खुद्द भाजपवरही त्यांची नाराजी आहे. ती का आहे, याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे.
‘पार्टी विथ डिफरन्स ‘ असा एके काळी नावलौकिक असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा पक्ष होय. एकेकाळी भाजपचे अत्यंत सच्चे नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा हा पक्ष. या दोन दिग्गजांनी तसेच त्यांच्याच समकालीन आणि काही मान्यवरांनी या पक्षाच्या वाढीसाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले. तर राज्य पातळीवर तिकडे विदर्भात नितीन गडकरी, पांडुरंग फुंडकर, इकडे खानदेशात एकनाथ खडसे, तर मराठवाड्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे तर पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुण्यामध्ये गिरीश बापट यांनी भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केले, किंबहुना पक्षासाठी मोठे योगदान दिले असे म्हटले जाते.
कालौवघात आता गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि पांडुरंग फुंडकर सारखे नेते आता या जगात नाहीत, तर एकनाथ खडसे सारख्या निष्ठावंत नेत्याला भाजपमधून बाहेर पडावे लागले असून राष्ट्रवादीशी जुळून घ्यावे लागत आहे, तर दुसरीकडे नितीन गडकरी देखील सध्याच्या एकूणच राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करीत असतात. त्यातच आता पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे भर पडली आहे. त्यांनी देखील भाजपाच्या एकूणच सध्याच्या राजकीय धेय्य धोरणावर स्पष्टपणे भाष्य केले असून याबाबत त्यांची नाराजी देखील दिसून येत आहे.
सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
आपल्या वाढदिवसानिमित्त खासदार गिरिश बापट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपसह सर्वच पक्षांवर नाराज असल्याचे सांगितले. बापट पुढे म्हणाले की, राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांचे राहिले आहे. गोर गरीब लोकांची लहान-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान पहाणे महत्त्वाचे आहे.
तसेच आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढ लागली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल तर पक्ष कसा उभा राहिले. मात्र आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालावी लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुलचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे. ही बाब माझ्यासारख्याला पटत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांवर मी नाराज आहे.
खरे तर कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल्याशिवाय त्याला कोणतेही पद देण्यात येऊ नये. ही कृती सर्वच पक्षांनी केली तर राजकारणातील स्तर टिकून राहिले. आत्ता निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ केले जाते. ही प्रवृत्ती माझ्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. त्याबाबत कोणीतरी बोलायलाच हवे. सध्या भाजपलाही सत्ता हवी आहे. हा निवडून येऊ शकत नाही. दुसरा निवडून येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सत्तेची राजकीय गणिते जुळविली जात आहेत. पूर्वी निवडणुकीतील अनामत रक्कमही जप्त झाली तरी चालत होते. आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेतले जाते. त्यामुळे निकषही बदललेले आहेत. हा सर्व प्रकार व्यथित करणारा आहे, अशी खंतही बापट यांनी बोलून दाखविली. आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बापट यांच्या नाराजी बाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BJP MP Girish Bapat Says Disappointed Politics