मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईहून दिल्लीकडे जाताच मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खलबतं झाली आहेत. रात्रीच्या सुमारास या दोन्ही नेत्यांची तब्बल ३ तास बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा आणि निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडा मुंबईसह राज्यातील आगामी महापालिका निवडणुका हा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी मिशन मुंबई १५० चे लक्ष्य भाजपला दिले आहे. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेत कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन करायचीच असा चंग बांधण्यात आला आहे. त्यासाठीच आता गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल ३ तास चर्चा झाली. रात्री उशिरा ही बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या मुंबई महापालिकेच्या मिशन १५० च्या अनुषंगाने ही बैठक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातो असून या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यात समन्वय कसा साधता जातो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
मुंबई मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेमकी काय चर्चा झाली, यावरुन आता तर्कवितर्कांना उधाण आले असून शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये मुंबई मनपावर भाजपची सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मागील 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली होती. शिवसेना व भाजपमध्ये अवघ्या काही जागांचा फरक होता. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक सोपी करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत अमित शाह हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्याची शक्यता आहे. शिंदे गट व भाजप ही निवडणूक एकत्रपणे लढवणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार की राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर लगेचच ही शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यामुळे देखील या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शाह यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचे राजकारण यशस्वी होत नसते. त्यांना धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणत अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप पूर्ण ताकदीने आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाईल, असे स्पष्ट मिळत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची भूमिका नेमकी कशी असणार आहे, हे लवकरच ठरणार आहे. शिवसेनेला अखेरचा दणका देण्यासाठी आगामी महापालिका निवडणूक जिंकण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप नेते आशिष शेलार यांनी, मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला होता.
देशात अनेक ठिकाणी यापुर्वी जवळपास अस्तित्व नसताना भाजपने ताकद पणाला लावून दुसरा मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. मुंबईत तर आधीपासूनच भाजपचे अस्तित्व आहे. गेल्या निवडणुकीत तर भाजपने जवळपास शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवत मोठी मजलही मारली आहे. त्यामुळे या वेळेस भाजपला सत्तेसाठी केवळ अखेरचा घाव घालायचा आहे असे भाजप नेत्यांचे मत आहे. त्यामुळेच शहा यांचा मुंबई दौरा हा अतिशय महत्वाचा समजला जात होता. २२७ जागा असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. सध्या महापालिकेवर प्रशासक राज आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, भाजपचे ८२, काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९ तर एमआयएमचे २ नगरसेवक निवडून आले होते. विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेत भाजपचे केवळ ३१ नगरसेवक होते. म्हणजेच २०१७ मध्ये भाजपने थेट ८२ जागांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळेच महापालिकेवर आपला झेंडा फडकावण्याच्या दृष्टीने सध्या तरी भाजपसाठी कंबर कसली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या गुप्त बैठकीनंतर भाजपकडून आता कोणता डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
After Amit Shah Tour Midnight Meet Between Eknath Shinde And Devendra Fadanvis
Politics Strategy BMC Elections Local Body BJP