इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी आज सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा करतानाच भाजपसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करीत राहणार असल्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले.
काँग्रेसच्या तोंडचा घास पळवून भाजपने कर्नाटकमध्ये सत्ता आणली होती. आमदारांच्या ऐतिहासिक पळवापळवीनंतर बीएस येडियुराप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दोन वर्षे ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. दोन दिवसांपूर्वी येडियुराप्पा यांनी यापुढे निवडणुक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेत भाषण करताना त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता.
यावेळी भाषण करताना ते भावुक झाले होते. दक्षिण भारतात भाजपचे अस्तित्व निर्माण करण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात येडियुराप्पांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. येडियुराप्पा यांनी १९८८ मध्ये कर्नाटक भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी ते १९८३ मध्ये पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेत निवडून आले. भाजपनेत्यांशी त्यांचे वारंवार वाद झाले. ते बाहेर पडले, नवीन पक्ष स्थापन केला पण पुन्हा भाजपमध्ये आले. त्यांनी सहा वेळा शिकारीपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
मला बाजुला सारलं होतं
आपल्या शेवटच्या भाषणात येडियुराप्पा यांनी भाजपबद्दलची आपली नाराजी स्पष्ट केली आणि त्याचवेळी लगेच प्रकरणही सावरले. भाजपने मला अनेक महत्त्वाच्या प्रसंगांना बाजुला सारलं. पण चारवेळा मुख्यमंत्री होण्याची संधीही दिली. अनेकांना एवढी संधी मिळत नाही. त्यामुळे मी निवृत्त झाल्यानंतरही पक्षासाठी काम करत राहणार आहे, असे येडियुरप्पा म्हणाले.
मोदींकडून कौतुक
येडियुरप्पा यांच्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भरभरून कौतुक केले आहे. येडियुरप्पा यांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी होते. त्यातून भाजपच्या नितीमत्तेचे दर्शन होते. त्यांच्या भाषणातून इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळेल, असे मोदी म्हणाले.
BJP Leader Yediyurappa Politics Retirement Announcement