जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या चर्चांवर गिरीश महाजनांनी उत्तर दिले असून, मला या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे ते म्हणाले आहेत.
“मला आधी हे स्पष्ट करायचं आहे की, माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. पण पेनड्राइव्ह प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राज्याचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बिहार किंवा उत्तर प्रदेश पोलिसांनाही लाजवेल, अशाप्रकारे षडयंत्र करून माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मी मोबाइलवरून कुणाला तरी तीन वर्षे १२ दिवसांपूर्वी धमकी दिली होती, त्यानंतर तीन वर्षे १२ दिवसांनी माझ्याविरोधात एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता,” असे महाजन सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना म्हणाले.
“तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितले की, हा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्यावर किती दबाव आहे. गुन्हा दाखल करावा, म्हणून खडसे किती वेळा फोन करतात, हेही त्यांनी मला सांगितलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांवरही तसा दबाव टाकला जात होता, हेही त्यांनी मला सांगितलं. अशा प्रकारे त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. या खोट्या गुन्ह्यानंतर माझ्यावर मोकाअंतर्गत कारवाईचा आदेशही देण्यात आला होता. पण मी उच्च न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयात गेलो. जिथे मला दिलासा मिळाला. पण हे सर्व षडयंत्र सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी रचलं होतं” असा आरोप गिरीश महाजनांनी केला आहे. “देवेंद्र फडणवीसांनी संबंधित पेनड्राइव्ह विधान सभेत ठेवला आहे.
ज्यामध्ये माझ्यावर केसेस कशा दाखल केल्या, मला कसं फसवलं, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांना कसं फसवायचं आहे, या सर्व षडयंत्राचं चित्रीकरण त्यामध्ये झालं होतं. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणीवासांनी विधानसभेत केली होती. सीबीआय चौकशी करावी, ही आमची मागणी होती. पण तत्कालीन सरकारने संबंधित प्रकरणावरून सरकारी वकील रवींद्र चव्हाण यांना हटवलं आणि सीआयडी चौकशी सुरू केली.”
सीबीआयकडून चौकशी
या प्रकरणात न्यायालयात दाद मागितली असून, सीबीआय चौकशीची आमची मागणी मान्य झाली असल्याचेही महाजन म्हणाले. आता याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. पेनड्राइव्हमधील माहिती खरी आहे की खोटी, यासाठी फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे. त्याचबरोबर सीबीआय चौकशीत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी अनेक बड्या नेत्यांची नावं घेतली आहेत, असा दावा महाजनांनी केला आहे.’
BJP Leader Minister Girish Mahajn CBI Case