सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणारे माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपा आमदार सीमा हिरे यांच्यासह सातपूर मंडलाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश आल्यानंतर, पक्षाने आता बंडखोरांसह पक्षविरोधी काम करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात अनेकांनी बंडखोरी करत पक्षविरोधी काम केल्याचे समोर आले आहे. ऐन निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या माजी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील यांच्यासह भाजपा कामगार मोर्चाचे चिटणीस विक्रम नागरे, अमोल पाटील,सार्थक नागरे, स्वप्रिल पाटील, निलेश भंदुरे या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
दरम्यान, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात पक्षात राहून पक्ष विरोधी भूमिका बजावणाऱ्याकडे पक्षाने आपली वक्रदृष्टी वळवली आहे. यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांचा समावेश आहे. जाधव हे ऐन निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करणार होते मात्र त्यांचा काही कारणास्तव पक्षप्रवेश होऊ शकला नाही, असे असताना देखील त्यांनी भाजपा उमेदवार सीमा हिरे यांचे काम न करता विरोधी पक्षातील शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा प्रचार केला असल्याचा स्पष्ट आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पत्रावर आ. सिमा अहिरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, गणेश बोलकर, रामहरी संभेराव,रवींद्र जोशी, शिवाजी शहाने, सीए मनोज तांबे, राजेश दराडे, संजय राऊत आदींसह सातपूर मंडल पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
…ही तर मालिकाच
शशिकांत जाधव यांनी यापूर्वीही पक्षविरोधी भूमिका बजावली आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांचे काम केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात त्यांनी अपूर्व हिरे यांचे काम केले असून नुकत्याच विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे काम केले असून शशिकांत जाधव यांची ही मालिकाच सातपूर मंडलने शहराध्यक्ष जाधव यांच्याकडे वाचली आहे.
पक्षाचा निर्णय मला मान्य
मी नाशिक पश्चिम मतदार संघ वगळता नाशिक पूर्व, चांदवड या मतदार संघात पक्षाचे काम केले आहे. पक्षाच्या वरिष्ठांना याची कल्पना होती. असे पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.
शशिकांत जाधव, माजी नगरसेवक बंडखोरांना थारा नाही
बंडखोरांना थारा नाही
पक्षाच्या उमेदवाराचा पराभव व्हावा यातूने काम करणाऱ्या कुठल्याही माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्याला पक्षात धारा नाही. सातपूर मंडल कदापि हे सहन करणार नाही.
भगवान काकड, मंडल अध्यक्ष