इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्रात सत्तांतर तथा सत्ता परिवर्तन होताच ईडी सीबीआय सारख्या तपास यंत्रणा विरोधकांच्या मागे लागल्या आहेत. त्यातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशी करून ताब्यात घेतले. सध्या ते तुरुंगात आहेत, असाच प्रकार सध्या बिहारमध्ये देखील सुरू आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नवे सरकार स्थापन झाले आहे. मात्र आता लालू कुटुंबियांवर पुन्हा ईडी आणि सीबीआयची कारवाई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेले लालू कुटुंबीय व राजद नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढू शकतो. सध्यातरी तीन पक्षांचे बडे नेते रडारवर आहेत. यात सृजनबरोबरच रेल्वे (आयआरसीटीसी) घोटाळ्यातही कारवाई होऊ शकते. सृजन घोटाळ्यातही सीबीआय नितीशकुमार सरकारमधील अनेक ज्येष्ठांना चौकशीसाठी बोलाविण्याची तयारी करीत आहे.
लालू कुटुंबावर आधीच सीबीआय किंवा ईडीची नजर आहे. राबडीदेवी यांच्या निवासस्थानापासून ते मीसा भारती यांच्या दिल्लीच्या निवासस्थानापर्यंत छापेमारी करण्यात आलेली आहे. आता लवकरच लालू कुटुंबीयांवरील कारवाईबाबत सीबीआय व ईडी सक्रिय होऊ शकतात. याच्या बदल्यात राज्य सरकार कोणत्या प्रकारची कारवाई करते, हेही समोर येईल. अशा स्थितीत पश्चिम बंगालसारखी स्थिती तर बिहारमध्ये होणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, बिहारमध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणत पुन्हा एकदा आरजेडीला सत्तेत आणल्यानंतर तेजस्वी यादव आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपावर चौफेर टीका केली आहे. सुशील कुमार मोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना तेजस्वी यादव म्हणाले की, केंद्र सरकारने आपल्या इशाऱ्यावर सीबीआयला सातत्याने आमच्याविरोधात वापरले आहे. मात्र आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही. तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, सीबीआयने आमच्या घरातच कार्यालय उघडावे, त्यासाठी आम्ही जागा देऊ.
बिहारचे नवे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आयआरसीटीसी टेंडर घोटाळा प्रकरणात जामिनावर आहेत. या प्रकरणी तेजस्वी यादवची आई आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही चौकशी करण्यात आली होती. सुशील कुमार मोदी यांनी याच विषयाकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले होते की, नितीशजी तुमचे उपमुख्यमंत्री जामिनावर आहेत. त्याच आरोपांना तेजस्वी यादव यांनी माध्यमांसमोर येत उत्तर दिले आहे.
भाजपा नेते नित्यानंद राज यांनी केलेल्या आरोपांनाही तेजस्वी यादव यांनी उत्तर दिलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार आणि माझ्या जोडीला जे लोक साप आणि मुंगुसाची जोडी म्हणत आहेत, त्यांच्या छातीवर साप बसला आहे. भाजपाच्या बड्या नेत्यांकडून देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण करण्यात आलेली नसल्याने भाजपाचे नेते संतप्त आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाला संपवण्याची जबाबदारी भाजपाच्या नेत्यांना देण्यात आली होती. मात्र होमवर्क पूर्ण न झाल्याने आता भाजपा सैरभैर झाली आहे.
Bihar Politics Lalu Yadav Family CBI ED Action Chances