इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणारा रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. हिंदीतील या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून मराठीतही तसाच कार्यक्रम सुरू करण्यात आला. याच मराठी बिग बॉसचा विजेता ठरलेला शिव ठाकरे, हिंदीतील १६ व्या पर्वाचा उपविजेता ठरला. नुकतेच त्याने मनोरंजन क्षेत्रातील कास्टिंग काऊचवर भाष्य केले.
अनेक रिऍलिटी शो मधून प्रसिद्ध झालेला अमरावती बॉय शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे. त्याच्या सरळ साध्या स्वभावामुळे तो सगळ्यांनाच भावला. आणि म्हणूनच आज तो प्रसिद्ध आहे. मराठी बिग बॉस मध्ये विजेता झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या बिग बॉस’ हिंदीच्या पर्वात शिव उपविजेता ठरला. तिथे उपविजेता ठरला असला तरी त्याच्या लोकप्रियतेत काही कमी झालेली दिसत नाही. उलट ती वाढतेच आहे. नुकतेच त्याने कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेकांना कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागल्याचे अनेकदा समोर आले आहे. यानंतर शिवने आपला अनुभव कथन केला आहे. त्यामुळे कास्टिंग काऊचचे भीषण वास्तव समोर आले आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत शिव ठाकरेने कास्टिंग काउचबद्दलचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मी एकदा ऑडिशनसाठी गेलो होतो आणि तिथे एक माणूस मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, ‘इथे मसाज सेंटर आहे’. मला ऑडिशन आणि मसाज सेंटरचा संबंध लक्षात आला नाही. तो मला म्हणाला, ‘ऑडिशन झाल्यानंतर तू एकदा इथे ये. तू वर्कआउटपण करतोस का…’असा त्याचा प्रश्न आल्यानंतर मी तिथून थेट बाहेर पडलो. कारण तो कास्टिंग डायरेक्टर होता आणि मला कोणताही वाद घालायचा नव्हता. मी सलमान खान नाही. पण या घटनेनंतर मला एक गोष्ट लक्षात आली की, कास्टिंग काऊचला स्त्री – पुरुष दोघांनाही सामोरे जावे लागते.
शिवने आणखी एका प्रसंगाबद्दल भाष्य केलं. “चार बंगल्यात एक मॅडम होत्या. त्या मला म्हणायच्या, ‘मी याला स्टार बनवलं, मी त्याला स्टार बनवलं.’ त्या मला रात्री ११ वाजता ऑडिशनसाठी बोलावत होत्या. मी एवढाही भोळा नाही की रात्री काय ऑडिशन्स होतात, हे मला समजत नसेल. मला काम आहे, त्यामुळे येऊ शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. यावर त्या म्हणाल्या, ‘तुला काम नाही करायचं का?’ ‘तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही’ असेही त्यांनी मला सांगितले. अनेकदा असं सांगितलं की आपण घाबरतो, कामाची गरज असते त्यामुळे अनेकदा जे मिळेल ते पदरात पडून घ्यायची मानसिकता असते. पण, मी मात्र यातील कशालाच बळी पडलो नाही. असं बोलून ते तुम्हाला डिमोटिव्हेट करत असतात. पण मी त्याची कधीच पर्वा केली नाही,” असं शिव सांगतो. थोडक्यात, शिवच्या या भाष्यामुळे पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचे भीषण वास्तव समोर आले आहे.
Big Boss Fame Shiv Thakare on Casting Couch Experience