नाशिक – देशाचे पंतप्रधान असू द्या किंवा राज्याचे मुख्यमंत्री आज काल सर्वच राजकीय नेते व राजकीय पक्ष सतत सोशल मीडिया माध्यमातून संवाद साधत असतात. फेसबुक पेजेस,ट्विटर, इंस्टाग्राम,युट्युब, अशा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून राजकीय नेत्यांकडून विविध कामांचे भूमिपूजने, उद्घाटने , सभा , दौरे यांचे फोटो, बातम्या, व्हिडिओज सातत्याने पोस्ट केल्या जातात. राज्यात व देशात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समितीत व नाफेडकडूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत असून कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहेत कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना असतांना राज्यातील व देशातील राजकीय नेत्यांचे मात्र सोयीस्कररित्या कांदा प्रश्नवरती दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांचे कांदाप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या सर्वच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओज आणि मेसेजेसजच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन
शेतकऱ्यांच्या कांद्याला तात्काळ ३० रुपये प्रति किलोचा भाव द्यावा अशी मागणी करावी वरिल मागणी करतांना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत कमेंट्स कराव्यात असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.
आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, पंतप्रधान, या सर्वांच्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पोस्टमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या बाजार भावात तात्काळ सुधारणा व्हावी व कांद्याला कमीत कमी ३० रुपये किलोचा दर मिळावा व कांद्याची जास्तीत जास्त निर्यात करावी यासाठी हजारो कमेंट्सच्या माध्यमातून आवाज उठवावा. आणि आपण केलेल्या कमेंट्स चे स्क्रीनशॉट काढून आपापल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करावेत कांद्याचे दर वाढण्यासाठी रास्ता रोको, मोर्चे यासारखे आंदोलने तर सुरूच राहतील परंतु आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टला शेतकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरक्षा पाऊस पाडून संबंधित नेत्यांचे कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधून घ्यावे जास्तीत जास्त कांदा उत्पादकांनी या आंदोलनात सहभाग घेतल्यास कांदा दरवाढीसाठी हे आगळेवेगळे कमेंट्स आंदोलनही मोठे प्रभावी ठरेल.