चित्रकुट (उत्तर प्रदेश) – अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर निर्माण प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मार्गी लागला असला तरी यातील अनेक अडथळे समोर येत आहेत.विशेषत: जमीन खरेदी प्रकरण तसेच मंदिराच्या बांधकामसंबंधी वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लक्ष घातले असून मंदिर निर्माण समितीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
राम मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेत यापुढे अडचणी येऊ नयेत म्हणून नवीन आणि विश्वासू पदाधिकाऱ्यांवर काही बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात येईल. कारण अलीकडेच अयोध्या मंदिर जमीन प्रकरणामुळे वादात आलेल्या मंदिर बांधकाम समितीबद्दल संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत. चित्रकूटमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संघाच्या चिंतन बैठकीत श्री रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील संबंधाबद्दलही चर्चा सुरू आहे.
ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांच्यासमवेत बैठकीत जमीन खरेदीच्या मुद्यावरही चर्चा झाली आहे. मंदिर बांधण्याच्या प्रक्रियेत यापुढे कोणतीही अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे, कारण यासाठी काही जुन्या लोकांना बांधकामाच्या जबाबदारीतून मुक्त करून नवीन लोकांना विश्वासात घेतले जाऊ शकते. संघाच्या चिंतन बैठकीत मुख्य विषयांवर चर्चा केली जात आहे. यात अयोध्येत अखंडपणे भव्य मंदिराचे बांधकाम प्रथम आणि प्राधान्य क्रमावर ठेवले आहे.
अनेक राज्यातील अन्य प्रमुख मंदिरांच्या देखभाल व तेथे आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भातही एक चौकट तयार करण्यात येत आहे. इतकेच नाही तर मठ आणि मंदिरांमध्ये मालमत्तेबाबत वारंवार होणाऱ्या वादांबद्दलही संघाने चिंता व्यक्त केली आहे. मठ आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबतही या बैठकीत चर्चा होत आहे. यासाठी संघ प्रमुख संतांचा सल्लाही घेणार आहे.