इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुणाचे नशिब कधी उजळेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार एका रिक्षाचालकाच्या बाबतीत झाला आहे. एका रात्रीतून तो थेट करोडपती झाला आहे. हे नेमकं कसं घडलं याची सध्या देशभरातच चर्चा रंगली आहे. हा रिक्षाचालक ओणम बंपर लॉटरी जिंकला आहे. केरळ राज्य लॉटरी विभागाने ओणम बंपर २०२२ चे निकाल जाहीर केले. ओणम बंपर २०२२ चे पहिले बक्षीस २५ कोटी रुपये होते. पहिला पुरस्कार तिरुअनंतपुरममधील श्रीवर्हम येथील रिक्षाचालकाला मिळाला आहे.
अनूप हा रिक्षा चालक असून यापूर्वी तो एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. अनुपने शनिवारी रात्री भगवती एजन्सीतून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. केरळ लॉटरीनुसार, अनुपचा तिकीट क्रमांक TJ 750605 होता. ज्यामुळे त्याला २५ कोटी रुपये मिळाले. कर कपात केल्यानंतर त्याला १५ कोटी ७५ लाख रुपये मिळतील.
लॉटरी लागल्यानंतर अनुप प्रचंड आनंदात आहे. यापूर्वी तो एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता आणि शेफ म्हणून काम करण्यासाठी मलेशियाला जाण्याचा विचार करत होता. त्याने कर्जासाठी बँकेशी संपर्क साधला आणि त्याचे कर्जही मंजूर झाले होते. अखेर त्याने परदेशी जाण्याचे रद्द करीत रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला.
केरळचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी रविवारी दुपारी वाहतूक मंत्री अँटोनी राजू आणि वट्टीयुरकावूचे आमदार व्हीके प्रशांत यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढला. या वर्षीची ओणम बंपर किंमत केरळ लॉटरीच्या इतिहासातील सर्वोच्च आहे. पहिल्या बक्षीसासाठी रु. २५ कोटी आणि दुसर्यासाठी रु. ५ कोटी आणि तृतीय बक्षीस म्हणून १० व्यक्तींसाठी प्रत्येकी रु. १ कोटी, अशी बक्षिसे होती.
यावर्षी ओणम बंपरची तब्बल ६७ लाख तिकिटे छापली गेली आणि जवळपास सर्व तिकिटे विकली गेली. तिकीटाची किंमत ५०० रुपये होती. लॉटरी हे केरळ सरकारच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. तिकिटांची विक्री करणार्या लॉटरी एजंट थँकराजलाही कमिशन मिळणार आहे. केरळवर राज्य करणारे राजा महाबली यांच्या शासनाच्या अंतर्गत सुशासनाच्या स्मरणार्थ ओणम साजरा केला जातो. ओणम हा कृषी उत्सव आहे.
https://twitter.com/thekorahabraham/status/1571463171357151233?s=20&t=8dhCPUlOzpFisXFwDtNrrw
Auto Driver Crorepati Within One Day
Keral Onam Bumper Lottery Anoop Jackpot