मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सुमारे तीन महिन्यांपूर्वी मोठे सत्तांतर नाट्य घडले, महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली, या सत्तांतर नाट्यदरम्यान आणि त्यानंतरही गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे शिंदे गटाने शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत वेगळा गट स्थापन केला तेव्हापासून शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, खासदार राज्यभरातील पदाधिकारी असो की कार्यकर्ते हे शिंदे गटात दाखल होत आहेत.
इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष आणि मनसे या पक्षाचे देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते गटात प्रवेश घेत आहेत, अर्थात ‘जिकडे सत्ता तिकडे मत्ता ‘ किंवा तिकडे आपले खूप कार्य आणि मोठा वाटा अशा पद्धतीने सत्तेकडे आकर्षित होत सर्वच पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे यांच्या गटांमध्ये दाखल झाल्याने कोणालाही फारसे आश्चर्य वाटले नाही. परंतु ज्या शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवणी करीत सत्ता स्थापन केली, त्या भाजपमधील कार्यकर्त्यांनीच इतकेच नव्हे तर सुमारे १०० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा वाटले आहे. कारण शिंदे गटाने फडणवीसांनाही धोका आणि धक्का देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत शिंदे गटाने दहिसरमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोडले आहेत. मुंबई व उपनगर परिसरातील सुमारे १०० हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत या महिला कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश सोहळा पार पडला, तेव्हा शिंदे गटात प्रवेश केलेल्या उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘ जय महाराष्ट्र ‘ असा जयघोष केला. प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघात असलेल्या मुंबई प्रभागामध्ये हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये भाजपाचे माजी वॉर्ड अध्यक्षा देखील होत्या. त्यांच्यासह कार्यकर्त्या महिलांनी शिवसेनेत हा प्रवेश केला. आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश सोहळा झाला असून उमेदवारी इच्छुकांनी प्रवेश केल्याचे चर्चा सुरू आहे.
विशेषतः सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात या संदर्भात चर्चा सुरू आहे, म्हणजे एक प्रकारे शिंदे गटाने आपल्या मित्राच्या म्हणजे भाजपच्या पाठीतच खंजीर खुपसला, असेही म्हटले जात आहे. अर्थात कोणत्याही पक्षात आयाराम गयाराम सुरूच असते, मात्र शिंदे गट हा दिवसेंदिवस प्रबळ होत आहे, आणि एक दिवस भाजपला मागे टाकून आणखी पुढे जातो की काय ? अशीही चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भाजप देखील महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याचे स्वप्न पाहत आहे. आता या चढाओढीत कोण वर चढतो हे काळच ठरवेल असे दिसून येते
दरम्यान, दुसरीकडे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे २ माजी नगरसेवक आणि ६ तालुकाध्यक्षांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का आहे.
Shivsena Rebel Shinde Group And BJP Politics
Eknath Shinde Devendra Fadanvis