नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एटीएम मशीनमध्ये ५०० रुपये विड्रॉल केल्यानंतर हातात तब्बल २५०० रुपये पडल्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? अगदी तशीच प्रतिक्रिया नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा गावातील ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळाली. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर एटीएम सेंटरवर एकच गर्दी उसळली.
येथील शिवा कॉम्पलेक्समध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरच्या बाजूला एसबीआय आणि एचडीएफसी बँकेचेही एटीएम सेंटर आहेत. एक युवक एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढून परतत असताना एक युवक त्याच्याजवळ आला आणि त्याला पाचशे रुपये मागून एक हजार रुपये देतो असे सांगितले. युवकाने त्याला पाचशे रुपये दिले. त्यानंतर तो युवक अॅक्सिस बँकेतून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि त्याला एक हजार रुपये दिले. त्याने हा सर्व प्रकार सांगितला.
मध्यरात्रीनंतर ही बातमी परिसरात पसरताच नागपूर, कोराडी, खापरखेडा येथील अनेक युवकांनी अडीच हजार रुपये काढून घेतल्याचे कळते. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित एटीएम सेंटरचे शटर बंद केले. बँकेच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी पाचारण केले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित एटीएम मशीनची तपासणी केली. पाचशे रुपयांचे विड्रॉल करून असे किती नागरिकांनी २५०० रुपये काढून नेले याची माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, अनेक जणांनी पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरकडे धाव घेतली, परंतु पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे नागरिक माघारी परतले. एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचा कोणताही मेसेज बँकेकडून संबंधितांना आला नाही. पैसे काढून घेणाऱ्या ग्राहकांचा डेटा काढून संबंधितांकडून अतिरिक्त पैशांची वसुली केली जाईल, अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.