नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : नवीन शैक्षणिक धोरण – २०२० च्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मध्ये प्रथम वर्षास व शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये द्वितीय वर्षास प्रवेश घेतलेल्या ज्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी आपले एबीसी / अपार आयडी तयार केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे मे २०२५ च्या परीक्षेचे निकाल जाहीर होणार नाहीत. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनी त्वरित एबीसी / अपार आयडीसाठी नोदणी करावी असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे करण्यात आलेले आहे.
नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मध्ये प्रथम वर्ष पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांस व शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये द्वितीय वर्षास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यात एम ११७ (एम. कॉम), एम ८३ (एम.ए. शिक्षणशास्त्र), एम ४८ (एम. ए. उर्दू), एम ४९ (एम. ए. मराठी), एम ५० (एम. ए. अर्थशास्त्र), एम ५८ (एम. ए. लोकप्रशासन), एम ५९ (एम. ए. हिंदी), एम ६० (एम. ए. इतिहास), व्ही १५१ (एम. एस्सी . गणित), व्ही १५२ (एम. एस्सी. पर्यावरण शास्त्र), व्ही १५३ (एम. एस्सी. भौतिकशास्त्र), व्ही १५४ (एम. एस्सी. रसायनशास्त्र), व्ही १५५ (एम. एस्सी. प्राणीशास्त्र), व्ही १५६ (एम. एस्सी. वनस्पतीशास्त्र) मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एबीसी आयडी / अपार आयडी (Academic Bank of Credit – ABC ID, APAAR ID – Automated Permanent Academic Account Registry) ची नोंदणी करणे अनिवार्य आहे, असे विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले होते. मात्र विद्यापीठ संकेतस्थळावर (https://ycmou.digitaluniversity.ac/ ) प्रसिद्ध केलेल्या यादीमधील विद्यार्थ्यांनी एबीसी / अपार आयडी ची नोंदणी अद्यापपावेतो केलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मे २०२५ च्या परीक्षेचे निकाल जाहीर होणार नाहीत.
त्यामुळे मुक्त विद्यापीठाशी संलग्नित सर्व अभ्यासकेंद्रांनी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीतील विद्यार्थ्यांशी संपर्क करून एबीसी / अपार आयडी (https://www.abc.gov.in/ या लिंकवर ) तयार करण्यास सूचित करावे. सदर विद्यार्थ्यांनी एबीसी / अपार आयडीसाठी त्वरित नोंदणी करावी. विद्यार्थ्यांनी एबीसी / अपार आयडी तयार केल्यानंतर तो nadsupport@ycmou.ac.in या इमेलवर आपले नाव, कायम नोंदणी क्रमांक (PRN), शिक्षणक्रम कोड, एबीसी आयडी नमूद करून दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यत पाठवावा असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी विद्यार्थी व अभ्यासकेंद्र यांना केले आहे.