नाशिक – बळीराजाला विविध संकटांनी ग्रासले असल्याने कधी कधी तो आशेचा किरण शोधत असतो. सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदत ही सुद्धा अनेक शेतकऱ्यांना खुपच दिलासादायक ठरत असते. अशा संकटग्रस्त शेतकऱ्याला सरकारी मदत मिळवून देण्यासाठी ९०० रुपयांची लाच घेणारी ग्रामसेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडली आहे.
चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील ग्रामसेविका अनिता रामभाऊ कुटेमाटे हिने हा प्रताप केला आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे कातरवाडी परिसरातील एका शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले. सरकारने या नुकसानीची भरपाई देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. ही भरपाई मिळावी यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आणि ती मदत मिळवून देण्यासाठी अनिता हिने शेतकऱ्याकडे थेट १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ९०० रुपये देण्या-घेण्याचे निश्चित झाले. आधीच संकटात असताना आता लाचेची रक्कम आणायची कुठून म्हणून या शेतकऱ्याने थेट एसीबीशी संपर्क साधला. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मनमाड येथील मनमाड-मालेगाव रोडवरील सानप कॉम्प्लेक्स येथे असलेल्या शितल टी स्टॉलवर अनिता हिने ९०० रुपयांची लाच स्विकारली. एसीबीने लावलेल्या सापळ्यात अनिहा ही अडकल्याने ती रंगेहाथ सापडली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने अनिता हिला ताब्यात घेतले आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. असा प्रकार घडत असल्यास त्वरीत एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.