पाटणा (बिहार) – शासकीय नोकरी करताना अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येतात. यामध्ये कारवाई झाल्यानंतर अनेक मोठे मासे गळाला लागतात. परंतु भ्रष्टाचार करताना पैसा नेमका कुठे ठेवावा? याचेदेखील भान या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नसते, त्यामुळे ते घरातच पैसा दडवून ठेवतात. मात्र कारवाई दरम्यान हा प्रकार उघडकीस येतो. बिहारमध्ये मॉनिटरिंग इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने कारवाई करीत लेबर चेंज ऑफिसर दिपककुमार शर्माच्या घरातून 25 दशलक्ष रोकड जप्त केली आहे, बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा नोंदवल्यानंतर दीपक कुमार शर्मा घाबरले असून त्यांचे धाबे दणाणले आहे. या संदर्भात तपास करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गैरमार्गाने प्रचंड संपत्ती कमवल्यानंतर दीपक कुमार शर्मा यांचे भान हरपले, काळ्या पैशाची एवढी मोठी रोकड घरात ठेवल्याचा पश्चात्ताप त्यांना नक्कीच झाला असावा.
एवढी मोठी रक्कम सापडल्यानंतर दीपक कुमार म्हणाला की, माझी मती शुद्धीवर नव्हती म्हणूनच मी एवढी मोठी रक्कम घरात ठेवली. मुलीच्या मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला खुप पैसे लागेल असे मला वाटले होते, अशी कबुलीही त्याने दिली आहे.
वास्तविक, राज्य शासनाच्या अंतर्गत गट ‘क’ पर्यंतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. परंतु दीपक कुमार शर्मा यांच्याकडे सापडलेल्या अनेक स्थावर मालमत्तांची माहिती त्यांनी मालमत्तेच्या तपशीलात दिली नाही. मालमत्ता लपवण्याच्या उद्देशाने असे केले गेले. आपल्या मुलीला मेडिकलमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी खूप पैसे लागतील, असे शर्मा याला वाटले असावे. तेव्हा त्यांना ना पाळत ठेवण्याच्या कारवाईची अपेक्षा होती ना घरात एवढी मोठी रक्कम असल्याची भीती वाटत होती. पण छापा पडताच तो मोठ्या संकटात सापडला.
संबंधित तपास अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कुमार शर्मा कैमूर जिल्ह्यात तैनात होते. बराच काळ ते मोहनिया येथील एकात्मिक चेक पोस्टवर अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. तेथे त्याने भरपूर पैसे कमावले असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक मालमत्तांची माहिती दिली नाही, लपविण्याचा प्रयत्न केला. दीपक कुमार शर्मा यांचा त्या कालावधीत अंदाजे 70 लाख रुपये उत्पन्न होते, त्याचबरोबर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 80 लाख रुपये आहे.