मुंबई – फोर्ड ही अमेरिकेच्या प्रमुख वाहन निर्माता कंपनी भारतीय बाजारात अनेक दिवसांपासून संघार्षाच्या काळातून जात आहे. फोर्डच्या वाहनांच्या विक्रीत सतत घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याशिवाय पोर्टफोलिओमध्ये कोणत्याही नव्या मॉडेलचा कंपनीकडून समावेश करण्यात आला नाही. आता फोर्ड भारतातील दोन कंपन्यांमधील उत्पादन बंद करणार आहे.
रॉइटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, फोर्ड कंपनीने कथितरित्या भारतातील आपले दोन वाहन निर्माता कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आर्थिक तोट्यात असल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. परंतु कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीय. या निर्णयचा अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.
साणंद आणि मराईमलाई येथील कंपन्यांमध्ये आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने दोन्ही प्लँट बंद करणार आहे. कंपनी काही कार आयात करून त्याची देशात विक्री सुरूच ठेवेल, असेही वृत्त अनेक माध्यमांमध्ये आले आहे. सध्याच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनी डिलरना सहकार्य करणार आहे. जनरल मोटर्स आणि हार्ले डेव्हिडसनसारख्या कंपन्यांनंतर फोर्ड तिसरी अमेरिकी कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार आहे.
विक्रीचे आकडे बोलतात
फोर्डच्या विक्री अहवालावर नजर टाकल्यास निराशाजनक आकडे हाती लागतात. गेल्या ऑगस्ट महिन्यात कंपनीने देशात एकूण १,५०८ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये हाच आकडा ४,७३१ होता. यादरम्यान कंपनीच्या विक्रीमध्ये एकूण ६८.१ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे.
सध्या फोर्ड भारतीय बाजारात फिगो हॅचबॅक, एस्पायर सेडान कारसह एसयूव्ही सेग्मेंटमध्ये इकोस्पोर्ट, अँडेवर आणि फ्रिस्टाइल मॉडेलची विक्री करते. गेल्या महिन्यात अँडेवरच्या वाहनांची सर्वात जास्त विक्री झालेली आहे. यादरम्यान कंपनीने या एसयूव्हीच्या एकूण ९२८ वाहनांची विक्री केली आहे. तर फोर्ड फिगोचे फक्त ७ युनिट विक्री झाले असून, हा नीचांक आहे.