माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा दिड ते दोन तर विदर्भात ३ डिग्री पर्यन्त वाढलेले जाणवत आहे. २६ जानेवारीपर्यंत थंडी कमीच जाणवेल. असे असले तरी मुंबई आणि ठाण्यातच सध्या थंडी जाणवत आहे. दमट हवामान असणाऱ्या मुंबईच्या परिसरातच थंडी का आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
ठाणे मुंबईतच थंडी का?
मुंबई, ठाणे या विभागाला सह्याद्रीने कुशीत घेतले आहे. अलिबागपासून पुन्हा सह्याद्री पश्चिमेकडे समुद्रात झेपावल्यामुळे उत्तरेकडून गुजरातमार्गे येणारे थंड वारे ठाणे-मुंबईला गारठवतात. पुढे दक्षिण कोकणात म्हणजे उर्वरित रायगड जिल्हा व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना काहीसा अटकाव होतो. त्यामुळे ह्या जिल्ह्यात थंडी कमी जाणवते.
उत्तरेतील थंडी कोकणात पाझरत असल्यामुळे मुंबई उपनगर व ठाण्यात सध्या कमाल व किमान तापमानात सरासरीपेक्षा २-३ डिग्रीने घसरण झाली असून थंडी जाणवत आहे. तसेच उद्या दि. २५ जानेवारीला महाराष्ट्रात एक दिवसाकरिता काहीसे ढगाळ वातावरण असेल.
आज, उद्या सध्या जात असलेले पश्चिमी झंजावात २६-२७ ला तर २८-२९ ला येणारे ३०-३१ ला उत्तर भारतात पाऊस-बर्फ पडल्यानंतर थंडी जाणवू शकते.
सध्या इतकेच!
Alert Forecast Winter Cold Climate Maharashtra