इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनाच्या ओमिक्रॉन अवताराचा सामुदायिक संसर्ग भारतात सुरू झाला आहे. त्यामुळेच महानगरांनंतर आता येत्या काही आठवड्यांत लहान शहरे आणि गावांमध्ये ओमिक्रॉन बाधित सापडणार आहेत. तशी भीती आयएमआय (IMA) कोची येथील कोविड टास्क फोर्सचे सल्लागार डॉ राजीव जयदेवन यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक लाटेत असाच ट्रेंड दिसून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ जयदेवन यांनी एएनआयला सांगितले की, “प्रत्येक वेळी लाट प्रथम मोठ्या शहरांमध्ये वाढत जाते, तिथे परिणाम करते. त्यामध्ये मेट्रो शहरे, लहान क्षेत्रे आणि नंतर गावे यांचा समावेश होतो. त्यामुळे, पुढील काही आठवड्यांत सध्याची ओमिक्रॉनची लाट लहान शहरे किंवा शहरांमध्ये आणि नंतर गावांमध्ये पसरेल. हा ट्रेंड केवळ भारतातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे.”
ओमिक्रॉन हा इतर कोविड प्रकारांसारखाच असेल की, सामान्य सर्दीप्रमाणेच मर्यादित, यावर डॉ. राजीव म्हणाले, “गेल्या दोन वर्षांतील साथीच्या रोगाचा इतिहास पाहिला तर, कोरोना संसर्गाचे सर्व व्हेरिएंट म्हणजेच प्रकार आता मृत झाले आहेत. दीर्घकाळ टिकणारा कोणताही प्रकार असणार नाही. भारतात कोरोनाचा मोठा प्रभाव दिसला. नंतर गेल्या वर्षी डेल्टाचा फटका बसला. आता या वर्षी ओमिक्रॉनचा संसर्ग आहे. पण ओमिक्रॉनचा फारसा परिणाम होणार नाही. कारण बऱ्याच जणांचे लसीकरण झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वेगवेगळ्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ओमिक्रॉनचा फुफ्फुसात संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. तसेच सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉन दोन्ही प्रकार सारख्याच स्तरावरचे दिसत आहेत. ओमिक्रॉन हा प्रकार डेल्टापेक्षा पूर्णतः वेगळा आहे. जेव्हा डेल्टा आला, तेव्हा आपल्याकडे मोठी भीती पसरली होती. कारण असा विषाणू यापूर्वी आपण कधीच पाहिला नव्हता. तसेच लोकांचे लसीकरणही केले गेले नव्हते. परंतु, ओमिक्रॉन अशा वेळी आला आहे, जेव्हा बहुतेक लोकांना एकतर संसर्ग होऊन गेला आहे किंवा त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे भीतीची गरज आता उरलेली नाही.”, असे त्यांनी सांगितले आहे.