मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या दहा महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. आज होणार उद्या होणार या विचाराने अनेक सत्तापक्षांमधील नेते नाराज झालेले आहेत. तर अनेकांनी आपली नाराजी जाहीरही केली आहे. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे.
नागपूर येथे पत्रकारांनी त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले. त्यावर मंत्रीमंडळ विस्तार शंभर टक्के होणार आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र आता त्यांनी या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टाकला आहे. ते म्हणाले, ‘मंत्रीमंडळ केव्हा होणार हे मुख्यमंत्री ठरवतील आणि तेच जाहीर करतील. अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सर्व निवडणुका एकत्र लढायच्या, दोन्ही पक्षांमध्ये तालुका स्तरापर्यंत समन्वय घडवायचा या विषयांवर चर्चा झाली.’
अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय झाल्याचे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा चालू असतानाच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो अहमदनगरमधला असल्याचा दावा केला जात आहे.
व्हिडियोने खळबळ
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक युवक नाचताना दिसत आहे. ही मिरवणूक नेमकी कशाची आहे? याचा व्हिडीओमध्ये खुलासा होत नसून हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे? याविषयीही खात्रीशीर माहिती अद्याप शकलेली नाही.
छत्रपतीच आराध्य दैवत
फडणवीस यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असाता त्यांनी, औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजच आहेत, असेही ते म्हणाले.
Ahmednagar Aurangjeb Poster Flashed Devendra Fadnavis