विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लसीकरणाने वेग पकडला असला तरी कोरोनाचे वेगवेगळे अवतार अजूनही धुमाकूळ घालत आहेत. लसीकरणामुळे कोरोनाला पूर्णपणे रोखता येणे शक्य आहे का याची चाचपणी वैज्ञानिकांकडून केली जात आहे. कोरोनाच्या अल्फा, बिटा, डेल्टा यासारख्या विविध अवतारांपासून बचाव करण्याच्या दृष्टीने नैसर्गिक संसर्ग आणि लस कशाप्रकारे अँटिबॉडी बनतात, याबाबत फान्सच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे. लस घेतलेल्या लोकांनाही त्याचा धोका असू शकतो. डेल्टा व्हेरिएंट अँटिबॉडीना चकवा देत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
संशोधकांनी १०३ लोकांची तपासणी केली. त्यामध्ये लस न घेतलेले अल्फाच्या संसर्गात आलेले लोक डेल्टाच्या तुलनेत कमी संवेदनशील आहेत. संशोधकांनी एस्ट्राजेनेका किंवा फायझर लशीचे एक किंवा दोन डोस घेतलेल्या ५९ लोकांच्या नमुन्यांचे परीक्षण केले.
एक डोस घेणार्या फक्त १० टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली. ही रोगप्रतिकारक शक्ती डेल्टा आणि बिटा व्हेरिएंटला सामान्य करण्यास सक्षम होती. लशीचा दुसरा डोस ९५ टक्के परिणामकारक दिसून आला. परंतु दोन्ही डोस घेतल्यानंतर अँटिबॉडीमध्ये मोठे अंतर किंवा बदल दिसून आले नाही. त्यामुळेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही लोकांना डेल्टा व्हेरिएंटचा धोका आहे.
वेगाने लसीकरण करणे आवश्यक
जगभरात कोविडमुळे होणार्या मृत्यूचा आकडा बुधवारी ४० लाखांच्या वर पोहोचला आहे. विषाणूचा डेल्टा अवतार समोर आल्यानंतर वेगाने लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दीड वर्षांत झालेले मृत्यू हे १९८२ नंतर जगात झालेल्या सर्व प्रकारच्या युद्धांमधील मृत्यूच्या समान आहे, असा अंदाज पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओसलोने व्यक्त केला आहे.
लसीकरणानंतरही डेल्टाचा फैलाव
लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रतिदिन होणार्या मृत्यूचे प्रमाण घटून जवळपास ७,९०० वर पोहोचले आहे. जानेवारीत दररोज १८ हजारांवर मृत्यू होत होते. यादरम्यान भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरात खळबळ उडाली. यशस्वी लसीकरण झालेल्या देशांपैकी अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आता डेल्टा वेगाने फैलावत आहे.
वास्तवापेक्षा मृतांचा आकडा कमीच
जगभरात कोविडमुळे झालेल्या मृत्यूचा नवा आकडा समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टॅड्रॉस एडहेनॉम घेहरेयेसस यांनी सांगितले, महामारी एका धोकादायक वळणावर आहे. अनेक देशांमधून मृतांचा योग्य आकडा सांगितला जात नसल्याने ४० लाख मृतांचा आकडा वास्तविक संख्येपेक्षा अधिकच आहे. लस आणि सुरक्षा उपकरणांची साठेबाजी करणार्या देशांवर त्यांनी टीका केली. महामारी जणू पूर्णपणे नाहीशी झाल्याच्या आवेगात अनेक देशांकडून निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. लसीकरण झाले तरीही असा विचार कोणीच करू नका, असा इशाराच त्यांनी दिला आहे.