मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाचे उपचार घेऊन तुम्ही बरे झाला असाल तर तुम्ही लस कधी घेऊ शकतात याचा मोठा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. लसीकरणाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दक्षता म्हणजेच बुस्टर डोसचाही उल्लेख करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, दक्षता डोससाठी पात्र कोरोना बाधितांच्या लसीकरणाबाबत देशातील विविध क्षेत्रांतून योग्य सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विकास शील यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीला लॅबमध्ये SARS-CoV-2 ची लागण झाल्याचे समोर आले तर बुस्टर डोससह लसीचा कोणताही डोस आजारातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनीच दिला जाऊ शकतो. यासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे. ही सूचना वैज्ञानिक तथ्ये आणि लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशींवर आधारित असल्याचे शील यांनी म्हटले आहे.
लसीकरणाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी १६ जानेवारीला सुरू झाला होता. या वर्षी ३ जानेवारीपासून ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले असून, १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांना बुस्टर डोस दिले जात आहेत. बुस्टर डोसही दुसरा डोस घेतल्याच्या तीन महिन्यांनंतर दिला जाणार आहे.
देशात दीडशे कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ६४ टक्के लोकांना एक डोस तर ४६ टक्के लोकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत. अशा परिस्थितीत देशात कडक लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होईल की नाही, याबाबत संभ्रम आहे. सध्या काही राज्य वगळता परिस्थिती नियंत्रणात आहे. लॉकडाऊन टाळण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.