मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद केल्याच्या अनेक चर्चा, बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, या बातमीमध्ये, चर्चामध्ये किती तथ्य आहे हे समोर आले नव्हते. आता माजी मंत्री आणि शिवसेने नेते आदित्य ठाकरेंनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद केल्याचे समोर आले होते. संबंधित बातमीबाबत ठाकरे अथवा शिंदे गटातील कोणत्याही नेत्यानं अधिकृत स्पष्टीकरण दिलं नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगानं ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्रं खरंच बाद केली आहेत का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केले असून ही बातमी खोटी असून बातमीच्या स्त्रोतावर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
विश्वास ठेवू नका..
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याच्या वृत्ताबाबत आदित्य ठाकरेंनी संबंधित बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही आदित्य ठाकरेंनी केले आहे. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना पूर्णविराम बसू शकतो.