मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू यांचा आमदार रवी राणा यांच्याशी संघर्ष टोकाला गेला आहे. समर्थनासाठी पैसे (खोके) घेतल्याचा आरोप राणा यांनी केला असून या आरोपांमुळे बच्चू कडू दुखावले गेले आहेत.
राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे, अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राणा यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर येऊन स्पष्ट करण्याची मागणी केली.
पुढे बोलताना कडू म्हणाले, पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दुर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले आमदार रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाहीत तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मी स्वबळावर चारवेळा निवडून आलो. तर राणा यांना चार पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. त्यामुळे आता मंत्रिपद मुद्दा नाही. आता प्रश्न राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे, असे सांगत राणा यांनी आरोप करण्यामागे कुणाचेतरी मोठे पाठबळ आहे, असा आरोपही कडू यांनी केला आहे.
आमदार कडू यांना चुकीचे आरोप करून थंड करायचे, राज्य सरकार मदत करत नसेल तर केंद्र सरकारची मदत घेऊन कडू यांना अडचणीत आणायचे, असे षड्यंत्र आमदार रवी राणा हे आपल्याबाबत आखत असल्याची व्हिडिओ क्लिप काही दिवसांनी आपल्याकडे येत आहे. ती क्लिप जाहीर करून राणा यांचे षड्यंत्र उघडे पाडणार, असा दावाही कडू यांनी केला.
जनतेसमोर सत्य आणणार..
राणा यांनी चुकीचे आरोप केल्यामुळे त्यांच्या विरोधात कडू यांनी पोलिसात तक्रार केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही नोटीस पाठवून राज्यातील जनतेला या प्रकरणात काय सत्यता आहे. एकातरी आमदाराने पैसे घेतले का, याची सत्यता सांगण्याची मागणी केली जाईल, असेही आमदार कडू यांनी स्पष्ट केले आहे.