मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याच्या हालचाली सुरु असून त्यात नाशिकच्या भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव आघाडीवर आहे. पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे फरांदे यांचे नाव चर्चेत आहे. फरांदे बरोबरच आमदार संजय शिरसाट, भारत गोगावले, बच्चू कडू, योगेश कदम, प्रकाश अबिटकर, सदा सरवणकर आणि बालाजी किणीकर यांचे नावही चर्चेत आहे. भाजपने आपले पत्ते अद्याप खोलले नसले तरी फरांदे यांच्या नावाची चर्चा आहे.
पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे गटाचे अनेक आमदार नाराज झाले होते. त्यामुळे त्यांना आता संधी दिली जाणार आहे. भाजपमध्ये नाराजी असली तरी ती उघडपणे कोणीच बोलून दाखवत नाही. त्यामुळे भाजप कोणाला संधी देतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुस-या मंत्रिमंडळात किती आमदारांना संधी मिळते. त्यात भाजप, शिंदे गट, मित्र पक्ष व अपक्ष आमदार यांची संख्या किती असेल व त्यात कोणाची वर्णी लागते हे अद्याप समोर आलेले नाही. या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबर महामंडळाचे वाटपही होण्याची शक्यता आहे.
प्रा. फरांदे यांनी सर्वप्रथम १९९७ साली नगरसेवकपदाची निवडणूक लढविली त्यात त्या विजयी झाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेत त्या सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी या काळात उपमहापौरपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. नाशिकमध्ये २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून त्या प्रथम निवडून गेल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा याच मतदार संघात विजय मिळवला.