अधिक मास विशेष (भाग ६)
देवाला नैवेद्य कसा दाखवावा?
अधिक मासानिमित्त आपण अनेक पूजा विधी, दान-धर्म करतो. घरात व्रत, पारायणाचे आयोजन करतो, त्यावेळी आपण नैवेद्य दाखवतो पण आपला देव आपण दाखविलेला नैवेद्य खाणार नाही याची आपल्यासर्वांना १००० टक्के खात्री असते. किंबहुना देव नैवेद्य खातच नाही याची आपल्याला गॅरंटी असते. आपल्याला फक्त संत नामदेवाचा नैवेद्य पांडुरंग खात असे याची ऐकीव कथा माहित असते. खरं तर यावरही आपला विश्वास नसतो.
नामदेवांचे विठ्ठलप्रेम लहानपणापासून दुथडी ओसंडून बाहात होते. पांडुरंग मूर्तीला ते पाषाणमूर्ती न समजता साक्षात आनंदघन मानीत. या बालभक्त्ताच्या प्रेमपाशात तो आनंदघन पूर्णपणे गोवला गेला होता. या संदर्भात नामदेवांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगतात ती अशी- नामदेवांच्या वडिलांचा असा एक नेम होता की, दररोज पूजा करून पांडुरंगाला ते नैवेद्य दाखवीत असत. एक दिवस दामाशेटीला कामाकरिता बाहेरगावी जावयाचे होते. म्हणून त्यांनी नामदेवाला देवळात जाऊन पूजा करावयास व नैवेद्य न्यावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले व नैवेद्य खाण्याविषयी त्यांनी देवाची हात जोडून प्रार्थना केली. पण देव नैवेद्य खाईना. नामदेवांनी पुन्हा देवाला प्रार्थना केली, “देवा, तूं जर आज नैवेद्य खाणार नाहीस, तर मी येथुन हालणार नाही.” असे बोलून ते तेथेच बराच वेळ बसले. भगवंतांनी नामदेवांची परीक्षा पाहाण्याचे ठरविले. बराच वेळ झाल्यावर नामदेव देवाला म्हणाले, “विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नाहीस तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन.”
जरा वाट पाहून देव नैवेद्य खात नाही असे पाहाताच नामदेव डोके आपटणार तोच भक्त्तवत्सल भगवंताने त्याला धरले व नैवेद्य आनंदाने खाल्ला.
नामदेवांचे जुने-नवे चरित्रकार वरिल अलौकिक घटनेचा निर्देश करीत आले आहेत. ही घटना जरी चमत्कारपूर्ण मानली गेली असली, तरीसुद्धा या प्रसंगा वरून बालनामदेवांच्या भोळ्या, श्रद्धाळू मनाचे दर्शन होते.
सांगायचे तात्पर्य एवढेच आपणही मनापासून श्रद्धेने देवाला नैवेद्य अर्पण केला तर तो देवा पर्यंत निश्चित पोहचू शकतो.
अधिक मासानिमित्त आपण अनेक पूजा विधी, दान-धर्म करतो. घरात व्रत, पारायणाचे आयोजन करतो, त्यावेळी जो नैवेद्य दाखवतो, तो अर्पण करण्याचा शास्त्रोक्त विधी असतो. ‘शास्त्र असे सांगते’, नावाच्या पुस्तकात नैवेद्य विधीचे छान वर्णन दिले आहे..
नैवेद्य समर्पण करण्याचा विधी व श्लोक:
नैवेद्याचे ताट वाढल्यावर तुलसीपत्र ताटातील पदार्थावर ठेवावीत व ताट दुसऱ्या ताटाने झाकावे, देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल करावे व त्यावर एक पाट ठेवावा. त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. डाव्या हातात पळी येऊन पळीतील पाण्याने उजव्या हातात पाणी घेऊन ताटाभोवती शिंपडत फिरवावे, पाणी सिंचन करताना, ‘सत्यं त्वर्तेन परिषिन्चामि’ हा मंत्र म्हणावा.
नंतर एक पळी पाणी ताम्हनात सोडावे आणि “अमृतोपस्तरणमति महणावे. त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेले ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे पाच घास दाखवून आणखी एक सहावा घास दाखविताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने भरवते, तसा भरावा धास भरवताना म्हणावे….
प्राणाय स्वाहा, अपानाय खाय खानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा!
नैवेद्य दाखवताना ग्रासमुद्रा दाखवाव्यात.
प्राणमुद्रा : कनिष्ठकामध्यमा अंगुष्ठ
अपानमुद्रा : अनामिकातर्जनी अंगुष्ठ
व्यानमुद्रा : मध्यमातर्जनी अंगुष्ठ
उदानमुद्रा : कनिष्ठिकाअनामिका अंगुष्ठ
समानमुद्रा : पाचही बोटे
पाचही बोटे वरील प्रकारे त्या त्या अंगुली एकत्र घेऊन ग्रासमुद्रा करावी. नैवेद्य दाखवून झाल्यावर एक पळी पाणी ताम्हनात सोडून ‘प्राशनार्थे पानीयं समर्पयामि.’ असे म्हणून एका पेल्यात देवाला प्यायला पाणी ठेवायचे. नंतर पुन्हा सगळे ग्रास दाखवावे. शेवटी चार पळ्या पाणी ताम्हनात सोडावे. पाणी सोडताना,
‘अमृतापिधानमसि’, ‘उत्तरापोशनं समर्पयामि’, ‘हस्तप्रक्षालम् समर्पयामि’, ‘मुखप्रक्षालनं समर्पयामि’ असे चार मंत्र म्हणावे. अत्तर असल्यास फुलाला लावून ‘करोद्वर्तनं समर्पयामि’ म्हण ते फूल देवास वहावे. अत्तर नसल्यास ‘करोद्वनार्थे चंदन समर्पयामि” म्हणून ते फूल गंध लावून देवास वहावे.
सरतेशेवटी, देवाला आवाहन करून म्हणावे, ‘तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपाशिर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्त्व उतरू दे आणि ते अन भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे.’ असा असतो नैवेद्यविधी.
हे सर्व वाचताना जरी वेळ लागत असला, तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो. तो वेळ जरूर काढावा, देवाशी क्षणभर संवाद साधावा. आपल्या आप्त-नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो, तसा देवाला करावा आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर जेवण मिळो, अशी प्रार्थना करावी. मगच तो प्रसाद ग्रहण करावा.
आजवर आपण कसा नैवेद्य दाखवत होतो?
एका कीर्तनात कथेकरी बुवांनी नैवेद्याचा विषय निघताच मजेशीर किस्सा सांगितला. बुवा म्हणाले, ‘आपण नैवेद्य दाखवतो, समर्पित करत नाही. आपल्याला माहित असते, दगडाचा देव खात नाही. तरी सुद्धा न जाणो, एखादा लाडू नाहीसा झाला तर, म्हणून प्रथम पाणी फिरवतो, मर्यादा घालतो, देवा या रेषेच्या आत येऊ नको असे बजावतो. काळीज धडधडते म्हणून हात ठेवतो. डोळे किलकिले करून पाहतो. एवढ्या सपाट्यातून देव यदाकदाचित आत येईल, म्हणून हाताने बाजूला सारतो. असा नैवेद्य दाखवून झाला, की चटकन ताट उचलून घेतो. मग कसा बरे पोहोचेल आपला नैवेद्य ?
आपण जे खातो, ते देवाच्या कृपेने. म्हणून पहिला घास त्याला. हे प्रेम समर्पण वृत्ती नैवेद्य देतांना आवश्यक असते. मग बघा देव जेवायला येतो की नाही.
(क्रमश:)
विजय गोळेसर 9422765227