अधिक मास विशेष (भाग १)
ऐका ऐका, अधिक मासा तुमची कहाणी!
यंदा 18 जुलैपासून अधिकमास सुरू होणार असून तो 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल. या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना म्हटलं जातं. हा महिना श्रावण महिन्यातच सुरू होणार आहे. त्यामुळे महादेवाची म्हणजेच शंकराच्या भक्तीचाही लाभ घेण्यासारखा आहे .आणि भक्ती करणाऱ्यांना अधिक वेळ मिळणार. यंदा अधिक मासा निमित्त इंडिया दर्पण अधिक मास महात्म्य ही विशेष लेखमाला सादर करीत आहे.
सर्वसामान्यपणे अधिक महिना हा तीन वर्षांनी येतो. या मागचे खगोलशास्त्रीय कारण म्हणजे चैत्रापासून तर फाल्गुन पर्यंत बारा महिन्यात 355 दिवस असतात आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सौर वर्षाचे दिवस 365 असतात. इथे दहा दिवस तीन वर्षांनी एकत्रित येऊन तीस दिवस झाल्यावर एक महिना अधिक फरक तयार होतो. या दोन्ही कालगणनेतील फरक काढून हे पुन्हा सारखे करण्यासाठी जो महिना चंद्र वर्षामध्ये टाकला जातो त्याला आपण अधिक महिना असे म्हणतो.
पुराणांत डोकावल्यावर अधिक मासा विषयी एक मनोरंजक आख्यायिका वाचायला मिळाली ती अशी, अधिक मासात संक्रांत नाही. तो काही ठरावीक ऋतुमध्ये येत नाही. त्या महिन्यात कोणतेही सणवार येत नाहीत. त्यामध्ये लग्नाचे किंवा अन्य मंगल प्रसंगांचे मुहूर्त काढले जात नाहीत. या तेराव्या महिन्याला स्वतःचे नाव आणि त्याला कोणतीही अधिष्ठात्री देवता नाही. बिचाऱ्या अधिक मासाला कोणी देवता नसल्यामुळे तो अशुभ ठरला. शुभ कार्यच काय, पितृकार्यदेखील या महिन्यात वर्ज्य मानले गेले. मग काय? सगळे जण त्याला ‘मलमास’ किंवा ‘मलीन मास’ म्हणून हिणवू लागले.त्याची छी:थू करू लागले.
अशी निंदा ऐकून अर्थातच अधिक मास फार दुःखी झाला. मग त्याने विष्णूची उपासना केली. त्याला विष्णू प्रसन्न झाले. त्याला विचारले, ‘तुला काय हवे आहे?’ अधिक मासाने आपले सगळे दुःख विष्णूला सांगितले आणि म्हणाला, ‘देवा, मला कोणी देवता नाही. माझे रक्षण करणारा कोणी स्वामी नाही. माझी लाज राखणारी अधिष्ठात्री देवता नाही. त्यावर काही उपाय कर.’
दयाळू विष्णूने त्याला स्वतःबरोबर गो-लोकात नेले, तिथे एका रत्नखचित सिंहासनावर मुरलीधर पुरुषोत्तम बसला होता. एखाद्या तेजस्वी ज्योतीप्रमाणे तो शोभून दिसत होता. ती दिव्यमूर्ती पाहून अधिक मास आनंदाने डोलू लागला. करुणासिंधू पुरुषाने मलमासाची व्यथा जाणून त्याला वरदान दिले ‘आजपासून तू माझा झालास. आता माझे सर्व देवी गुण तुझ्यात लीन होतील, यामुळे तुला कोणीही मल मास म्हणणार नाही. तुला आता सगळे जण ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखतील. या महिन्यात जे कोणी धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील, त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांची मनोरथे पूर्ण होतील आणि माझ्या कृपेने त्यांना मुक्ती मिळेल,’ मुरलीधराचे ते शब्द ऐकून पुरुषोत्तम मासाला अतिशय आनंद झाला. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, तसे पुरुषोत्तमाच्या दिव्य दर्शनाने अशुभ समजला जाणारा अधिक मास शुभ झाला.
एकदा ऋषी-मुनींनी महषीं व्यासांना अधिक मासा विषयी प्रश्न विचारला. महर्षींनी त्यांना अधिक मासाचे माहात्म्य सांगितले, ते म्हणाले, ‘एका वर्षांतील बारा पौर्णिमांचे एक चांद्र वर्ष होते. त्याचा कालावधी आहे ३५४.३६ दिवसांचा, एका वर्षातील सूर्याचे १२ राशीतून संक्रमण, म्हणजे एक सौर वर्ष हा कालावधी आहे ३६५.२४ दिवसांचा. त्या दोघांच्या कालावधीमध्ये १०-११ दिवसांचा फरक आहे. कालगणना नीट होण्यासाठी, या दोन्हींचा मेळ बसवायला लागतो, म्हणून साधारण दर अडीच वर्षांनी दोन्हीमध्ये ३० दिवसांचा फरक पडला, की चांद्र वर्षात एक अधिक मास घेऊन दोघांची सांगड घातली जाते. ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही. त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो. मग त्या वर्षात १२ ऐवजी १३ महिने असतात.
अशा प्रकारे अधिक महिन्याचे संदर्भ वेदिक साहित्यात देखील आढळतात. वैदिक पंडितांच्या लक्षात आले की चंद्र आणि सूर्य ही एक महत्त्वाची कालगणना यांच्या एकमेकांशी मिळण्यासाठी काही दिवसांचा फरक पडत होता. इतकच नाही तर हे अंतर भरून काढण्यासाठी त्यांनी काही दिवस अधिक जोडण्यात आले. वेदिक काळातच हे अंतर भरून काढण्यासाठी दर तीन ते चार वर्षाच्या अंतरात हे अधिक दिवस जोडण्यात आले. याच काळाच्या कालगणनेला अधिक महिना असे म्हणतात
खगोलशास्त्रीय महत्त्व
अधिक महिन्याचे खगोलशास्त्रा चे महत्व जाणले तर पृथ्वीच्या सभोवतालच्या प्रमाणामुळे सूर्य हा 12 राशीमधून प्रवास करतो असं लोकांचं म्हणन आहे. सूर्य प्रत्येक राशी मधून प्रवास करत असताना एक वर्ष पूर्ण करतो. त्याला 365 दिवस पाच तास 48 मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी (ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले वर्ष हे १२ चांद्र मास (महिने) असतात. ते मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. असे म्हणतात चंद्रमा आणि सूर्य यांची सांगड घालण्यासाठी अकरा दिवसांचा फरक असतो. इतकच नाही तर ते भरून काढण्यासाठी पंचांगात अधिकमासाची विशिष्ट प्रकारची योजना तयार करण्यात आली आहे. दर तीन वर्षात होणाऱ्या त्या दिवसाचा फरक अधिक मास टाकून ही कालगणना जोडून घेण्यात आली आहे.
अधिक मास काही राज्यांतच
भारताच्या सूर्याभित पंचांग पाळणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतात जसे की आसाम ,ओरिसा ,केरळ तामिळनाडू ,पश्चिम बंगाल या राज्यात हा महिना पाळला जात नाही. तो फक्त चंद्र पंचांग वापरणाऱ्या विविध राज्यात जसे की आंध्र प्रदेश , कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सारख्या राज्यात पाळला जातो. यावरून हे सिद्ध होते की प्रत्येकाकडून निर्माण केलेल्या मासा चे महत्त्व तेथील राज्या पुरतेच मर्यादित आहे.
चैत्र ते अश्विन या महिन्यातच अधिक मास का येतो?
दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या कॅलेंडरनुसार काही वेळा एका चंद्रमासात सूर्याचे दोन संक्रांति येतात .हे जरी शक्य असेल म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो असे का? नाही अजिबात नाही अशावेळी मार्गशीष पौष या महिन्यात अधिकमास कधीही येत नाही जसे की क्षमस येतात तेव्हा आजूबाजूच्या महिन्यांमध्ये केव्हा तरी थोड्या अंतराने दोन अधिक मास येतात.
आपल्या महिन्याच्या तिथी चंद्रावर आधारित आहे. जसे पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते तसेच चंद्र देखील पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतो आणि त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 29.5 दिवस लागतात. आणि यालाच चंद्रमास असे म्हणतात.
जर सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेतील सांगड घातली नसती तर आपल्याला पावसात दिवाळी आणि उन्हाळ्यात जन्माष्टमी साजरी करावी लागली असती. अश्या प्रकारे सणांची आणि ऋतूंची साखळी बसण्यासाठी चैत्र ते अश्विन या महिन्यामधेच अधिक मास येत असतो.
यावर्षी मंगळवार 18 जुलैपासून अधिक मास सुरू होईल एकच नाही तर 16 ऑगस्ट रोजी हा महिना संपेल. सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधनाचा या वर्षी ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन येणार आहे.अधिकमास सुरू झाल्यामुळे श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधनात 46 दिवसाच्या अंतर राहिल.
समज किंवा गैरसमज :- काय करावे आणि काय करू नये?
या महिन्यात विवाह सोहळे करणे टाळावे . या महिन्यात हाती घेतलेले काम पूर्णत्वास येईलच असे नाही असे लोकांची मान्यता आहे . या महिन्यात कुठलंच काम यशस्वी होत नाही असे लोक म्हणतात. या महिन्यात विवाह सोहळा केल्यास वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होत नाही असे मानले जाते. घरामध्ये भांडण ईर्षा या महिन्यात निर्माण होऊ शकते म्हणून या महिन्यात विवाह सोहळे करणे टाळावे. त्यामुळे सर्व बोलणी पूर्ण झाल्यावर विवाहासाठी शुभ मुहूर्त हा एक तर अधिक महिन्यापूर्वीचा निवडावा किंवा अधिक महिना संपल्यावर योग्य मुहूर्त पाहून विवाहाचे मंगलकार्य सिद्धीस न्यावे, असे जाणकार सांगतात.
अधिक महिन्यात कोणती काम यशस्वी होतात?
या महिन्यात केलेले उपवास केलेले केलेला यज्ञ यशस्वी ठरते असं मानले जाते या महिन्यात शुद्ध मनाने शुद्ध विचाराने विष्णूची पूजा केल्यास माणसाने केलेल्या पापाचा पृथ्वीवरच मोक्ष प्राप्त होतो आणि स्वर्ग प्राप्ती होते असे मानले जाते. तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्ये केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
अधिक मासात काय करावे?
ॠषिमुनींच्या या प्रश्नावर व्यास ऋषी म्हणाले, ‘अधिक मासात जे कोणी जप, तप, व्रत, पूजा, यज्ञ, होम करतील, त्यांना अनंत पुण्य प्राप्त होते. जे लोक भगवद्गीता, भागवत कथा अथवा रामकथेचे वाचन किंवा श्रवण करतात,त्यांना विशेष पुण्य प्राप्त होते. पुरुषोत्तम मासात जे भक्त भूमीवर झोपतात, एक वेळ जेवतात आणि दानधर्म करतात, त्यांना मनःशांती मिळते. पुरुषोत्तम महिन्यात प्रत्येकाने काही तरी विशेष यागाचे, योगाचे,आरोग्याचे, मनःशांतीचे पुण्यकर्म करावे. पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा, श्री भागवत कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्रनाम, पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप करावा. जे असे व्रत घेतील, त्यांना पुरुषोत्तम मास लाभेल.’
यामुळेच यावर्षी अधिक मास महिमा जाणुन घेणार आहोत. अधिकमास महात्म्य आणि अधिक मास का सुरु झाला हे सांगणार्या काही पौराणिक कथा आपण पुढच्या भागात पाहणारआहोत.
(क्रमश:)
विजय गोळेसर मोबा. ९४२२७६५२२७