पुणे – कोरोना संसर्गाचे संकट दूर करण्यासाठी सध्या जगभरात मोठा लढा सुरू आहे. याचसाठी कोरोना प्रतिबंधक लसही विकसित करण्यात आली आहे. भारतासह देशोदेशी लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. मात्र, अद्यापही कोरोनाच्या लढाईत मोठा धोका असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी प्रथमच भाष्य केले आहे.
कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. ही लस सध्या जगातील अनेक देशांना दिली जात आहे. त्यामुळे पुनावाला नक्की काय म्हणत आहेत याकडे अनेकांचे लक्ष आहे. पुनावाला म्हणाले की, कोरोना महामारीवर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये सध्या लशीबद्दल असलेला संकोच, उदासिनता आणि गैरसमज हा सर्वात मोठा धोका आहे.
पूनावाला यांनी एक ट्विट केले असून त्यात म्हटले की, लस उद्योगाने देशासाठी पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत. आज २० कोटींहून अधिक डोस अनेक राज्यांकडे उपलब्ध आहेत. मी सर्व प्रौढांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन करतो. मात्र या महामारीवर मात करण्यासाठी लसींचा संकोच आता सर्वात मोठा धोका आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही सर्व नागरिकांना लशीकरण करण्याचे आवाहन केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, अँटी-कोविड-19 लसीचा पूर्ण डोस घेतलेल्या लोकांच्या संख्येने देशात प्रथमच एकच डोस घेणार्यांची संख्या ओलांडली आहे. तसेच बुधवारी सकाळी ७ वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार देशात एकूण ११३.६८ कोटी डोस देण्यात आले आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३८,११,५५,६०४ असून पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ३७,४५,६८, ४७७ झाली आहे.
https://twitter.com/adarpoonawalla/status/1460994818046410762