नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील दिग्गज अदानी समूह लवकरच नाशिक शहराला वीज पुरवठा करणार आहे. तशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीनेच दिली आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये केवळ महावितरण कंपनीचा वीज पुरवठा होत आहे. नजिकच्या काळात अदानीचीही वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशकात प्रथमच खासगी वीज व्यावसायिक पुरवठा सेवेत उतरणार आहे.
अदानी ट्रान्समिशनने नाशिक परिसरात वितरण व्यवसायासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड ही शाखा समाविष्ट केली आहे. नाशिक शहरात समांतर वितरण परवाना लागू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने १६ मार्च २०२३ रोजी ‘अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड’ (AENL) नावाने संपूर्ण मालकीची उपकंपनी समाविष्ट केली आहे. तशी माहिती अदानी उद्योग समूहाने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेड या कंपनीची गुजरातमधील अहमदाबाद येथे १६ मार्च रोजी नोंदणी करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार अदानी इलेक्ट्रिसिटी नाशिक लिमिटेडने अद्याप त्यांचे व्यवसाय कार्य सुरू केलेले नाही.
स्पर्धा निर्माण होणार की
अदानींच्या कंपनीने वीज पुरवठा सुरू केला तर नाशिक शहरात महावितरण आणि अदानी असे दोन पुरवठादार राहणार की फक्त अदानीला परवानगी दिली जाणार याबाबत काहीही स्पष्टता झालेली नाही. एकाचवेळी दोन पुरवठादार असले तर वीज पुरवठ्याच्या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होईल. यातून ग्राहकाला दर्जेदार सेवा आणि किंमतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
मुंबईच्या धर्तीवर की
मुंबईमध्ये टाटा, अदानी, रिलायन्स यांच्या माध्यमातून वीज पुरवठा होत आहे. अशाच पद्धतीने आता राज्यातील विविध शहरांमध्ये वीज पुरवठ्याची सेवा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जाते. मात्र, यासंदर्भात अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. महावितरण कंपनी प्रचंड तोट्यात आहे. शिवाय सरकारची मालकी त्यावर आहे. महावितरणचा तोटा दूर करण्यासाठी खासगी कंपन्यांना वीज पुरवठ्याचे क्षेत्र उपलब्ध करुन दिले जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
Adani Transmission has incorporated an arm, Adani Electricity Nashik Ltd, for distribution business in the Nashik area. https://t.co/5zmWe4urOE
— Business Standard (@bsindia) March 17, 2023
Adani Electricity New Company Nashik City Power Distribution