इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘केजीएफ चाप्टर 2’ हा यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट. यशची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही तुफान यश मिळाले. कमाईचे अनेक नवे विक्रम या कन्नड चित्रपटाने रचले. केवळ कन्नड भाषेतच नाही तर हिंदीतही केजीएफ २ ला चांगला प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षकांना केजीएफच्या पुढच्या भागाची अर्थात केजीएफ – ३ ची प्रचंड उत्सुकता आहे. या तिसऱ्या भागात यशसोबत अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी दिसणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण, दुसऱ्या भागाच्या शेवटी रीनाचा (श्रीनिधी) मृत्यू दाखवण्यात आला आहे. या सगळ्या प्रश्नांवर स्वतः श्रीनिधीनेच उत्तर दिले आहे.
केजीएफच्या दुसऱ्या भागाच्या क्लायमॅक्सने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अधिरा आणि रॉकी अर्थात संजय दत्त आणि यश यांच्यातील वैर संपलं का, रीनाचा खरंच मृत्यू झाला का असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. यावर श्रीनिधीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला एका चाहत्याने केजीएफ 3 बद्दल प्रश्न विचारला. ‘केजीएफ ३ मध्ये तुझी भूमिका असेल का? आम्हाला तिसऱ्या भागात रीनाची भूमिका परत हवी आहे,’ अशी विचारणा एका चाहत्याने केली आहे.
त्यावर श्रीनिधी लिहिते, ‘मला खरंच या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. यासंबंधीच्या प्रमुख माणसालाच या प्रश्नाचं उत्तर विचारावं लागेल. आणि ती व्यक्ती कोण हे तुम्हाला माहीत आहे, ‘पीएन’. श्रीनिधीने उल्लेख केलेला पीएनचा म्हणजे प्रशांत नील. प्रशांत हा केजीएफ चाप्टर १ आणि २ चा दिग्दर्शक आहे. तोच तिसऱ्या भागाचंही दिग्दर्शन करणार आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत म्हणाला होता की, केजीएफचं विश्व आणि त्यातील भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. त्यामुळे तिसरा भाग येण्याची शक्यता आहे. तिसरा चाप्टर कधी येईल माहीत नाही, पण आमचे त्यावर काम सुरू आहे.
Actress Srinidhi Shetty on KGF 3 Upcoming movie
Entertainment