सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मिडियावरही अतिशय सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर ती विविध प्रकारच्या पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करीत असते. विनोदी प्रतिसादामुळे तिचे चाहतेही खुश असतात. अनेकदा ट्रोल करणाऱ्यांना ती साडेतोड उत्तर देताना दिसते.
सोनाक्षीने आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर ‘ask me anything’ हा सेशन ठेवला होता. चाहत्यांनी तिला मजेदार प्रश्न विचारले आणि तिनेही तसेच मजेदार उत्तर दिले. एका चाहत्याने विचारले की, ती सध्या काय करत आहे, तिने सांगितले की ती विकेंडला सोफ्यावर बसून मार्वल मुव्हीजचे सर्व चित्रपट पाहतेय. दुसर्या पोस्टमध्ये तिने दाखवले की ती नुकतीच पाचवा चित्रपट पाहत आहे. तसेच पुढचा चित्रपट ‘थोर’ आहे. एका चाहत्याने तिला प्रश्न केला की, तिची आवडती नोज पिन कोणती आहे? यावर, तिने नोज पिनसह स्वतःचा एक फोटो शेअर केला.
प्रश्नोत्तराचा हा संवाद चांगलाच रंगला. त्याचवेळी एका चाहत्याने विचारले की, ‘मॅडम सर्वांचे लग्न झाले आहे, मग तुम्ही लग्न कधी करणार?’ सोनाक्षीने त्याला खुमासदार शैलीत उत्तर दिले, सर्वांना कोविड-19 होत आहे, मग मलाही झाला पाहिजे का?’ तिच्या या उत्तराने चाहत्यांमध्ये हसू पिकले.
सोनाक्षी सिन्हाने चित्रपटांसाठी कोस्च्युम डिझायनर म्हणून काम केल्यानंतर, तिने २०१० मध्ये ‘दबंग’ या अॅक्शन- ड्रामा चित्रपटात रज्जो पांडेची भूमिका साकारली. दमदार अभिनयाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडे, सोनाक्षी सिन्हाने तिचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा स्विमवेअर परिधान केला होता. या फोटोला कॅप्शन म्हणून तिने जलपरीचा इमोजी टाकला आहे. सोनाक्षी सिन्हा सध्या आगामी चित्रपट ‘डबल एक्सएल’ वर काम करीत आहे. यात तिच्या सोबत हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट फॅट शेमिंगच्या मुद्द्यावर आधारित आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती.