सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज तिचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांची ती पत्नी आहे. ‘पुकार’ आणि ‘वास्तव’ सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची तिने मने जिंकली. सध्या ती बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असते.
नम्रताप्रमाणेच तिचा पती साऊथ सुपरस्टार महेश बाबू देखील सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असतो. आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेता महेश बाबूने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट केली आहे. त्याने नम्रता शिरोडकरचा एक सुंदर फोटो शेअर केला असून त्याखाली लिहिले आहे की, “हॅपी बर्थडे एनएसजी… तू माझा रॉक आहेस. माझे जग माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद..”
नम्रताने बॉलिवूड आणि साऊथच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1993 मध्ये नम्रता शिरोडकरने ‘मिस इंडिया युनिव्हर्स’ तसेच ‘मिस इंडिया एशिया पॅसिफिक’चा किताब पटकावला होता. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत करिअरला सुरुवात केली. नम्रताने ‘वास्तव’, ‘कच्चे धागे’, ‘पुकार’, ‘अस्तित्व’ आणि ‘दिल विल प्यार व्यार’ आणि ‘ब्राइड अँड प्रिज्युडिस’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2002 मध्ये नम्रताने तेलुगू चित्रपट ‘वामसी’ साइन केला आणि तिची महेश बाबूशी भेट झाली. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. महेश बाबू हा पत्नी नम्रतापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघांना गौतम आणि सितारा अशी दोन मुले आहेत. ब-याच दिवसांनी महेश बाबूसाठी आनंदाची पर्वणी आली आहे. त्यांचा भाऊ रमेश बाबू यांचे काही आठवड्यांपूर्वी निधन झाले होते. त्याआधी महेश बाबूलाही कोविडची लागण झाली होती. तसेच, महेश बाबूचा ‘मेजर’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तो या चित्रपटाची निर्मिती करत आहे.