इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झळकणारी गुणी अभिनेत्री अशी मृण्मयी देशपांडे हिची ओळख आहे. ‘कुंकू’ या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली. यातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. यासोबतच ‘अग्निहोत्र’ मालिकेतही तिने आपली भूमिका उत्तमरित्या निभावली होती. नंतर मात्र ती, चित्रपटसृष्टी अर्थात मोठ्या पडद्याकडे वळली. तिथेही तिने आपले अभिनय कौशल्य दाखवत दर्जेदार चित्रपट केले. आता पुन्हा मृण्मयी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. यामुळे तिचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.
मृण्मयी देशपांडे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘शाब्बास सूनबाई’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या मालिकेतील एका सोहळ्याच्या दृश्यात ती दिसली आहे. मालिकेतील लग्न सोहळ्यात मृण्मयी संगीत सोहळ्यात उपस्थित राहणार असून यावेळी तिचा धमाल डान्सदेखील पहायला मिळणार आहे. ‘शाब्बास सूनबाई’ ही मालिका वेळोवेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. संजीवनी आपली वाटचाल कशी करते याचे चित्रण या मालिकेत दाखवण्यात आले आहे.
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत मृण्मयीने आपला ठसा उमटवला आहे. तर ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘स्लॅमबुक’ सिनेमात तिने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
Actress Mrinmayee Deshpande Marathi TV Serial