इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – समाजात कितीही जागृती केली तरी ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार काही कमी होताना दिसत नाहीत. उलट सामान्य माणूस म्हणता म्हणता सेलिब्रिटी देखील अशा ऑनलाईन फसवणुकीला बळी पडताना दिसत आहेत. नुकतेच याचे एक उदाहरण समोर आले आहे. अभिनेता धर्मेश व्यास यांना असा फटका बसला असून त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढण्यात आले. मात्र, त्यांनी वेळीच पोलिसात धाव घेतल्याने हे पैसे त्यांना परत मिळणार आहेत.
अंधेरीतील न्यू म्हाडा लोखंडवाला परिसरात धर्मेश व्यास राहतात. ७ डिसेंबर रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. तुमचा पासपोर्ट आला आहे, मात्र, तो डिस्पॅच करण्याचा कोड ब्लॉक झाला आहे, तो अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील, असे त्यांना सांगितले. धर्मेश व्यास शूटिंगमध्ये असल्याने त्यांनी कोणताही विचार न करता त्या फोन नंबरवर पाच रुपये पाठविले. त्यानंतर, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण ९९ हजार ९९९ रुपये काढले गेल्याचा मेसेज त्यांना मिळाला. तेव्हा त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधला. त्यांचे म्हणणे ऐकून हा ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा व्यास यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी वेळीच ओशिवरा पोलिसात धाव घेतल्याने त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार आहेत.
ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे व निरीक्षक सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, हवालदार अशोक कोंडे, कॉन्स्टेबल विक्रम सरनोबत यांनी प्राप्त माहितीच्या आधारे तात्काळ फिर्यादीच्या एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क करून झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. तेव्हा व्यास यांचे पैसे आयडीएफसीमध्ये वळते झाल्याने त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ व्यास यांची फसवणूक झालेली सर्व रक्कम गोठविण्यात यश मिळाले.
Marathi Actor Dharmesh Vyas Cheating Online Fraud
Cyber Crime