नाशिक : जेलरोड भागात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७२ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. अनिलसिंग परदेशी (रा.विशाल बंगला,बेला डिसुझा रोड भिमनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मृत वृध्द नेहरूनगर येथील चिल्ड्रन ग्राऊंड येथे शतपावली करून आपल्या घराकडे पायी परतत असतांना हा अपघात झाला. परदेशी सायंकाळी नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी नेहरूनगर येथील सीआयएसएफच्या चिल्ड्रन ग्राऊंड येथे गेले होते. फेरफटका मारून ते घराकडे पायी परतत असतांना हा अपघात झाला. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळच भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्यास गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुलगा रितेश परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.