नाशिक : नादुरूस्त उभ्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु झाला. या अपघातात कारमधील तीन जण जखमी झाले असून हा अपघात द्वारकापरिसरातील उड्डाणपुलावर झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत शंकर मांडोळे (५५ रा.पाथर्डी फाटा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून या अपघातात कारमधील देविदास शंकर मांडोळे व राजू शंकर पाटील हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी रविंद्र मांडोळे (रा.छत्रपतीनगर,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. मांडोळे बंधू शनिवारी (दि.१३) पारोळा जि.जळगाव येथे गेले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास ते उड्डाणपुलावरून पाथर्डी फाट्याच्या दिशेने एमएच १५ एफएफ ९४५८ या अल्टो कारमधून प्रवास करीत असतांना हा अपघात जाला. टॅक्टर हाऊस समोरील उड्डाणपुलावर भरधाव कार एनएल ०१ एए ९०३४ या नादूरूस्त कंटेनरवर जावून आदळली. या अपघातात वसंत मांडोळे यांचा जागीच मृत्यु झाला. तर तीन जण जखमी झाले. उभ्या कंटेनरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. कंटेनर चालकाने कुठल्याही उपाययोजना न करता भररस्त्यात आपले नादूरूस्त वाहन उभे केले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.