नाशिक : सोसायटीचे प्रवेशद्वार उघडत असतांना एकाने अश्लिल भाषा वापरत महिलेचा विनयभंग केल्याची घटना महात्मानगर भागात घडली. पीडितेच्या कुटुंबियांनी याबाबत जाब विचारला असता संशयीताने आपल्या साथीदारांना बोलावून घेत शिवीगाळ करीत कुटुंबियास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. सुरज प्रमोद पाटील (२४ रा.पुजा अपा.पाईपलाईन रोड) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. महात्मानगर येथील पाण्याच्या टाकी भागात राहणारी महिला शनिवारी (दि.१३) रात्री आपल्या सोसायटीचे प्रवेशद्वार उघडत असतांना संशयीताने हॉट ए यार असे अश्लिल शब्द वापरून महिलेचा विनयभंग केला. यावेळी महिलेने तुझी हिम्मत कशी झाली असा जाब विचारला असता त्याने प्रशांत गवळे व अन्य दोन साथीदारांना बोलावून घेत पीडिता व तिच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस नाईक पगार करीत आहेत.