सिटी लिंक बसने दिलेल्या धडकेत सायकलस्वार ठार
नाशिक : गंगापूररोडवरील बारदान फाटा भागात भरधाव सिटी लिंक बसने दिलेल्या धडकेत सायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. पंडीत भागुजी झोले (४९) असे अपघातात ठार झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात बसचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोले गुरूवारी सायंकाळच्या सुमारास गंगापूररोडने सायकलवर आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. बारदान फाटा येथील भवर टावर नजीकच्या गणेश स्विट दुकानासमोर पाठीमागून येणा-या एमएच १५ जीव्ही ८००६ या भरधाव सिटीबसने सायकलला धडक दिली. या अपघातात झोले गंभीर जखमी झाले होते. कमरेस मोठी दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा सागर झोले याने दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या बसचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.
वृध्द महिलेच्या बॅगेतील पर्स मधून चोरट्यांनी केली लंपास
नाशिक : नाशिकरोड ते पंचवटी दरम्यान सिटी लिंक बसमधून प्रवास करीत असतांना वृध्द महिलेच्या बॅगेतील पर्स मधून चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये सुमारे ७२ हजार रूपये किमतीचे दागिणे होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हौसाबाई कृष्णा लहाने (६९ रा.सोनगिरी ता.सिन्नर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. हौसाबाई लहाने या गुरूवारी शहरात आल्या होत्या. नाशिकरोड येथून त्या नांदूरमार्गे पंचवटी या बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. आसनावरील कॅरीमध्ये ठेवलेल्या बॅगेची चैन उघडून चोरट्यांनी पाकिट चोरून नेले. या पाकिटात सोन्याचे मंगळसुत्र,नथ व अन्य साहित्य असा सुमारे ७२ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलीस नाईक कु-हाडे करीत आहेत.