महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल
नाशिक : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर ठाण्यात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील भांडणाची कुरापत काढून हा विनयभंग केला आहे. सुनिल शर्मा आणि परवेज खान अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेची मुलगी व संशयित सुनिल शर्मा एकाच शाळेत शिक्षण घेतात. गुरूवारी (दि.५) रात्री पीडिता आपल्या मुलीस सोबत घेवून डान्स क्लासचे कपडे घेण्यासाठी गेली असता ही घटना घडली. या ठिकाणी त्यांना संशयित सुनिल शर्मा यांची मुलगी भेटली. पीडितेने तिला वडिलांना बोलविण्यास सांगितले असता तीने आरडाओरड करून आपल्या पित्यासह त्याच्या मित्रास बोलावून घेतले. संतप्त दोघांसह मुलीने पीडित महिलेस शिवीगाळ करीत तसेच मागील भांडणाची कुरापत काढून तिला लाथाबुक्यांनी मारहाण करून विनयभंग केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पीडितेने यापूर्वी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित शर्मा याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोरे करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी केला १९ हजाराचा ऐवज लंपास
नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १९ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना पेठरोडवरील तवली फाटा भागात घडली. या घरफोडीत मोबाईलसह एलईडी टिव्ही,साऊंड सिस्टीम, गॅस टाक्या व अॅरो फिल्टर चोरुन नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर भिकाजी पिंगळे (रा.पिंगळे फार्म,गंगावाडी मखमलाबादरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पिंगळे यांच्या फार्म हाऊस मधील दोन्ही रूमचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे १८ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरूवारी (दि.५) रात्री घडली. अधिक तपास पोलीस नाईक एस.वाय.गवारे करीत आहेत.