दुचाकी झाडावर जावून आदळल्याने चालकाचा मृत्यू
नाशिक : महामार्गावरील इंडियन ऑईल कंपनीच्या समोर दिशादर्शक खांबास धडक देत भरधाव दुचाकी झाडावर जावून आदळल्याने चालकाचा मृत्यू झाला. या अपघातात एक तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोकुळ देविदास वाघ (२४ रा.एरंडेगाव ता.मालेगाव) असे मृत चालकाचे नाव असून या अपघातात वैभव माधव देवरे (२२ रा.अमृतनगर,सायट्रीक ना.रोड) हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
वाघ व देवरे एकमेकांचे मित्र असून ते शुक्रवारी दुपारच्या सुमारास महामार्गाने विल्होळी कडून द्वारकाच्या दिशेने पल्सर एमएच ४१ बीजी ५१६६ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सर्व्हीस रोडने दोघे मित्र प्रवास करीत असतांना चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडली. अंबड औद्योगीक वसाहतीतील न्यू इंडियन अॅाईल कंपनी समोर भरधाव दुचाकीने दिशादर्शक धडक दिली. यानंतर मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. या अपघातात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील चालक गोकूळ वाघ याचा मृत्यू झाला असून वैभव देवरे याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
घरगुती वापराच्या विज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक : घरगुती वापराच्या विज चोरीप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरीरोडवरील बेलदारवाडीतील विनोद मोहिते (रा.बेलदारवाडी,म्हसरूळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने वीज कंपनीच्या मिनी निपलर मधून अंदाजे ३० फुट केबलच्या सहाय्याने वीज चोरी केली. १५ फेब्रुवारी रोजी पथकाने या भागात धाडसत्र राबविला असता हा चोरीचा प्रकार समोर आला. कुठलीही परवानगी न घेता संशयिताने बेकायदा वीज जोडणी करून राजरोसपणे घरातील विद्यूत उपकरणांसाठी वीज वापरतांना मिळून आला. या प्रकारामुळे वीज कंपनीचे सुमारे ७ हजार ८३० रूपयांचे नुकसान झाले असून वीज अधिकारी सुदर्शन सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा म्हसरूळ पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.