इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतामध्ये सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या मोबाईल अॅपपैकी एक व्हॉट्सअॅप आहे. आपल्या प्रिय व्यक्तींच्या संपर्कात राहण्यापासून ते अगदी कार्यालयीन कामांसाठीही या अॅपचा जबरदस्त वापर केला जातो. मेसेज, फोन, व्हिडिओ, मिडीया, लोकेशन, ऑनलाईन पेमेंट सारखी कामे या अॅपच्या माध्यमातून चुटकीसरशी होतात. आता आणखी एक फीचर आपल्याला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी व्हॉटसअॅपची सुरक्षा हा चर्चेचा विषय बनला होता. हा विषय सार्वजनिक झाला असला तरी व्हॉट्सअॅपवरची वैयक्तिक सुरक्षा हा देखील महत्त्वाचा विषय आहे. व्हॉटसअॅपवर आपल्याला अनोळखी नंबरवरुनही मेसेज येतात, तेव्हा हा नंबर कोणाचा, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर काही वेळा कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या व्यक्तींनाही आपल्याला आपल्याबद्दलची सगळी माहिती कळू द्यायची नसते. आपण स्टेटस टाकले की ठराविक व्यक्तींपासून ते लपवण्याची सोय आपल्याला आहे. पण प्रोफाईल पिक्चरचे काय, असा प्रश्न राहतोच.
आता व्हॉटसअॅप आता नवीन फिचर घेऊन येणार आहे. सध्याच्या काळात ठराविक कॉन्टॅक्सपासून प्रोफाईल फोटो लपवण्याची कोणतीही सुविधा नाही. एकतर आपल्याला त्या व्यक्तीला थेट ब्लॉक करावे लागते, नाहीतर आपला फोटो त्याला दिसतोच. पण या वर्षात व्हॉटसअॅपकडून तशी सुविधा उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. ही सुविधा एंड्रॉईड बीटा अपडेटपैकी एका अपडेटमध्ये दिसून आले आहे. त्यामध्ये माय कॉन्टॅक्स एक्सेप्ट, फीचर देण्यात आले होते. जेणे करून ज्या कॉन्टॅक्टला आपला प्रोफाईल फोटो दाखवायचा नसेल त्यापासून आपण तो लपवू शकतो.
या फिचरमुळे आपल्याला प्रायव्हसीबाबतचे जास्त अधिकार प्राप्त होणार आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांसाठी ही आनंदाचीच बाब ठरेल यात शंका नाही. यापूर्वी आपल्याला कोणी मेसेज पाठवला की तो वाचूनही अनरिड करण्याची सुविधा व्हॉट्सअॅपने दिली आहे. अद्याप प्रोफाइल फोटो लपवण्याच्या सुविधेबाबत व्हॉट्सअॅपने अधिकृत स्पष्टीकरण दिले नसले तरी त्याची सुरुवात याचवर्षी होईल, अशी शक्यता मात्र वर्तवण्यात येत आहे.